Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

Aurangabad: गोलवाडी उड्डाणपुलाची एक बाजू सुसाट; दुसरीचे काम वेगात

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : वाळूज रस्त्यावरील गोलवाडी ते नगरनाका दरम्यान रेल्वे उड्डाणपुलाची एक बाजू वाहतुकीस खुली करण्यात आल्याने जुन्या धोकादायक अरूंद पुलावरील कोंडी कमी झाल्याने प्रवाशांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत आहे. दुसऱ्या बाजुचे काम देखील युद्धपातळीवर केले जात असल्याने येत्या आठ दिवसांत ती वाहतुकीस खुली केली जाणार आहे. याच पुलाच्या शेजारी जुन्यापुलाचे देखील नव्याने बांधकाम केल्यास गैरसोय भविष्यातील होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मात करता येईल, अशी भावना औरंगाबादकरांनी व्यक्त केली आहे. 

औरंगाबाद - पुणे महामार्गावरील नगरनाका ते गोलवाडी दरम्यान २४ तास होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी व वाढते अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी जुन्या रेल्वे उड्डाणपुलालगत पर्यायी उड्डाणपूल बांधावा यासाठी गेल्या ४० वर्षांपासूनची औरंगाबादकरांची मागणी होती. 

यासाठी 'दमरे' (दक्षिण मध्य रेल्वे) तसेच सार्वजनिक बांधकाम मंडळ आणि जागतिक बॅंक प्रकल्प शाखेतील अधिकारी, जिल्हा आणि विभागीय प्रशासनाचा पाठपुरावा आणि त्यांच्या प्रयत्नांना पाठबळ देणाऱ्या केंद्रीय संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांमुळेच आज येथील रेल्वे उड्डाणपूल उभारला गेला. येथील उड्डाणपुलामुळे वाहतुक कोंडीचा मोठा अडथळा दूर झाल्याने औरंगाबादकर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे धन्यवाद व्यक्त करत आहेत.

नगरनाका-गोलवाडी या साडेतीन किलोमीटर रस्त्याच्या सहापदरीकरणाचा तिढा जून २०१३ मध्ये सुटला. केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालय व राज्य सरकारच्या मालकीच्या जमिनीचे अदला-बदलीद्वारे हस्तांतरण कराराच्या प्रारूपाला सरकारने मंजुरी दिली. तत्कालीन जिल्हाधिकारी विक्रमकुमार व संरक्षण खात्यातर्फे ब्रिगेडिअर सुरेंद्र पावामणी यांनी करारनाम्यावर स्वाक्षऱ्याही केल्या.

जमीन ताब्यात आल्यावर तीन वर्षानंतर नगरनाका ते गोलवाडी फाट्यापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत जागतिक बँक प्रकल्प शाखेमार्फत रस्ता सहापदरीकरण करण्यात आला. मात्र, गोलवाडी येथील रेल्वे उड्डाणपुलाचा तिढा तसाच प्रलंबित होता. संरक्षण मंत्रालयाने जागा ताब्यात देऊनही रेल्वे आणि राज्य सरकारच्या वादात बांधकामाचा मुहूर्त लांबणीवर पडला होता.

यासंदर्भात औरंगाबाद येथील ॲड. रूपेश जैस्वाल यांनी खड्डेमय याचिकेसोबतच गोलवाडी पुलाचा मुद्दा न्यायालयात उपस्थित केला. न्यायालयीन सुनावणीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या कामाचे ऑगस्ट २०१९ दरम्यान टेंडर काढण्यात आले. राज्य सरकारने  डीपीआरनुसार  १९ कोटी ६८ लाखाच्या अंदाजपत्रकीय रकमेला प्रशासकीय व वित्तीय मंजुरी दिली.

टेंडर प्रक्रियेत सहा टक्के कमी दराने इच्छुक असलेल्या खंडुजी पाटील यांच्या के. एच. कन्सट्रक्शन कंपनीला पुलाच्या बांधकामाचे कंत्राट मिळाले होते. १८ कोटी रकमेच्या या कामाला १८ महिन्याची मुदत होती.

कंत्राटदाराने खोदकाम सुरू करताच कोविड-१९ या जागतिक संसर्गजन्य आजाराने लाॅकडाउनचे ग्रहण लावले. त्यात वर्ष दीड वर्ष कंत्राटदाराला काम बंद ठेवावे लागले. त्यानंतर अतिवृष्टीमुळे चार ते सहा महिने काम करता आले नाही. विशेष म्हणजे सुरवातीच्या पहिल्या टप्प्याचा निधी देखील कमी दिल्याने कंत्राटदाराची आर्थिक अडचण वाढली होती. परिणामी कामाची गती कमी झाली होती. याचा परिणाम वाहतुकीवर होत होता.

नव्या पुलाच्या कामाची धिमी गती असल्याने जुन्या रेल्वे उड्डाणपुलावर मोठा भार वाढला होता. चाळीशी उलटलेल्या कमकवत पुलावरून वाहतुक सुरू होती. त्यात पुलाच्या संरक्षक भिंतीला पडलेले भगदाड आणि तडे, अशा खिळखिळी अवस्था पाहून प्रवाशांमध्ये भितीची दहशत निर्माण होत होती. मात्र आता नव्या पुलाचा आधार मिळाल्याने प्रवाशांच्या मनातली भिती गायब झाली आहे.