Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

जिल्हाधिकाऱ्यांच्या सिंगमफेम कारवाईनंतर अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सिंगमफेम कारवाई करत कांचनवाडी परिसरात मोठी वाळूचोरी पकडली. या कारवाईनंतर विभागीय आयुक्तांच्या चौकशी फेऱ्यात अडकलेले पैठण-फुलंब्रीचे एसडीएम स्वप्नील मोरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याशिवाय अप्पर तहसिलदार विजय चव्हाण, तहसिलदार दत्तात्रय निलावाड, तहसिलदार ज्योती मोरे व मंडळ अधिकाऱ्यांसह तलाठी व नायब तहसिलदारांचे धाबे दणाणले आहे.

औरंगाबाद जिल्हा गौण खनिज अधिकारी कार्यालयामार्फत पैठण तालुक्यातील घारेगाव परिसरातील वाळूपट्ट्याचे टेंडर काढण्यात आले होते. त्यात सलीम पटेल या इच्छुक ठेकेदाराने अधिक दराने टेंडर भरल्याने त्याला १० फेब्रुवारी २०२२ रोजी वाळूपट्टा मंजूर केला होता. टेंडरच्या अटीशर्तीनुसार केवळ २,९६८ ब्रास वाळू उत्खननाचा परवाना दिला होता. मात्र, पटेल यांनी अटीशर्तीतील गौण खनिज कायद्याचा भंग करत पोकलॅन्ड व जेसीबीच्या सहाय्याने नदीचे पोट फाडत २,३३४ ब्रास जास्तीचे वाळू उत्खनन केले. ठेकेदाराच्या मनमानी कारभाराविरोधात  ग्रामस्थांनी तक्रारी केल्या, पण महसुल प्रशासन बघत नव्हते. न्यायालयाच्या आदेशाने महसूल प्रशासनाने जूनमध्ये 'ईटीएस' मशीनद्वारे सदर वाळूपट्ट्याची मोजणी केली. त्यात जास्तीचे उत्खनन झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर ठेकेदाराला ७ कोटी २० हजाराचा दंड लावण्यात आला होता. मात्र, वसुलीबाबत एसडीएम स्वप्नील मोरे यांनी मौन पाळले होते. विभागीय आयुक्तांच्या दणक्यानंतर कारवाईसाठी हालचाली सुरू केल्या. ठेकेदारावर गुन्हा देखील दाखल केला. 

खुलाशानंतर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

दोन दिवसांपूर्वीच मोरे यांनी घारेगाव प्रकरणी विभागीय आयुक्तांकडे खुलासा सादर केला. मात्र तिसऱ्याच दिवशी गुरूवारी दुपारी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी थेट दुचाकीवर जाऊन कांचनवाडीतील नाथ व्हॅली शाळा परिसरात मोठी वाळूचोरी पकडली. त्यानंतर अप्पर तहसिलदार विजय चव्हाण यांनी ट्रक जप्त केला. ट्रकमालकाचा शोध सुरू आहे. आता ही वाळू कुठून आली? ट्रक कोणाचा होता? या प्रश्नांची उत्तरे स्वतः जिल्हाधिकारी घेत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या धडक कारवाईत महसूल प्रशासनातील आधीच चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले पैठण-फुलंब्रीचे एसडीएम स्वप्नील मोरे यांच्या अडचणीत वाढ तसेच अप्पर तहसिलदार विजय चव्हाण, तहसिलदार ज्योती मोरे यांचे देखील धाबे दणाणले आहे.