Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

जिल्हाधिकाऱ्यांनी केली रस्त्याची पाहणी अन् ठेकेदार लागला कामाला

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या पाहणीत राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांसह प्रकल्प सल्लागार आणि ठेकेदारांना घाम फुटला अन् अखेर औरंगाबाद-जळगाव महामार्गाच्या कामाचा प्रश्‍न खऱ्या अर्थाने मार्गी लागला.

कामात हलगर्जीपणा करणारे ठेकेदार सुतासारखे सरळ झाले असून, पाण्डेय यांच्या तंबीनंतर ठेकेदारांनी कामाची गती वाढवली आहे. २४ तास सुरू असलेल्या या कामामुळे रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांची खटक्यांच्या त्रासातून सुटका झाली आहे. याशिवाय फेब्रुवारी महिन्यात अजिंठा लेणी न्याहळण्यासाठी जाणाऱ्या विदेशी पाहुण्यांचा देखील मोठा त्रास कमी होऊन जगभर नाचक्‍की थांबणार आहे. ३१ जानेवारीची जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली डेडलाईन पाळण्यासाठी कंत्राटदार दिवस-रात्र काम करत आहेत. जी-२० च्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी या प्रकरणात लक्ष दिले होते. त्यानंतर आता या रस्त्याचे काम  कंत्राटदारांनी जलदगतीने सुरू केले आहे. यामुळे कामाला गती आल्याचे स्वतः टेंडरनामा पाहणीत समोर आले आहे.

जळगाव-औरंगाबाद हा रस्ता सिमेंट काँक्रिटमध्ये बांधण्यात येत आहे. या कामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २९ जुलै २०१७ रोजी करण्यात आले होते. सद्यस्थितीत या रस्त्याचे काम ८५ टक्के झाले आहे. गेल्या कित्येक वर्षापासून रस्त्याचे चौपदरीकरण करावे , अशी मागणी करण्यात येत होती. रस्ता भूमिपूजन कार्यक्रमातही केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी ही अपेक्षा व्यक्त केली होती. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी, खान्देश-विदर्भ व त्यामार्गे उत्तर भारतात जाण्यासाठी हा रस्ता अत्यंत उपयोगी आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे. रस्ता अरूंद व वाईट असल्याने या रस्त्यावर सतत अपघात होतात, त्यात कित्येकांचा बळी गेला असून अनेक जण जायबंदी झाले आहेत. त्यामुळे या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यास गडकरींनी अनुमती दिली होती. त्यामुळे या रस्त्याचे  दुपदरी चौपदरी करणाचा प्रस्ताव ऑगस्ट २०१७ मध्ये राष्ठ्रीय महामार्ग विभागाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता लक्ष्मीकांत जोशी यांच्या काळात राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे पाठवण्यात आला होता.

सुधारीत प्रस्तावानुसार १४८ किलोमीटरचा या रस्त्यासाठी दीड हजार कोटी रूपये मंजूर करण्यात आले. औरंगाबाद-सिल्लोड, सिल्लोड-फर्दापुर, फर्दापूर-जळगाव अशा तीन टप्प्यात या रस्त्याचे काम करण्याचे ठरले. या सर्व कामाचे कंत्राट आंध्रप्रदेशातील लॅन्सको अँड ऋत्विक कंपनीना दिले होते. चौपदरीच्या सुधारीत प्रस्तावानुसार या रस्त्याची रुंदी २४ मीटर व दीड मीटर रुंदीचे दुभाजक तसेच दोन्ही बाजुने दोन मीटरचे डांबरी पट्टे असा अंदाजपत्रकात समावेश करत वाहतूकीसाठी २०.६ मीटर रूंद रस्ता खुला ठेवण्यात आला आहे. मात्र, सुधारीत प्रस्तावानुसार  रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर ऐनवेळी भूसंपादन करावे लागल्याने मोठा त्रास सहन करावा लागल्याचा ठेकेदारांचा दावा आहे. यात मध्येच रस्ता पूर्णपणे खोदून आधीचा ठेकेदार ऋत्विक एजन्सीने काम अर्धवट सोडून पळ काढला यामुळे अनेक अपघात झाले. पावसाळ्यात संपूर्ण रस्ता चिखलमय होत असे. अनेक ठिकाणी बस, ट्रक व इतर वाहने अडकून पडत होती. त्यानंतर मुळ ठेकेदाराला पडद्यामागे ठेऊन औरंगाबाद-सिल्लोडपर्यंत-आर. के चव्हाण तर सिल्लोड-फर्दापूर-आर एस. कामटे, फर्दापूर ते जळगाव- स्पायरा इन्फ्रा भटनागर या तीन कंत्राटदारांना देण्यात आले. मात्र ठेकेदार बदलले तरी कामात प्रगती दिसत नव्हती. यावर ' टेंडरनामा' ने या संपुर्ण मार्गाची पाहणी करत वृत्तमालिका प्रसिद्ध केली. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर अखेर रस्तेकामात प्रगती होत आहे.