Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

औरंगाबाद : भिमनगर-भावसिंपुरा रस्त्याच्या कामासाठी आंदोलनाचा इशारा

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : ३१७ कोटींच्या स्मार्ट सिटी रस्ते विकास योजनेंतर्गत मंजूर झालेला ७ कोटी रुपयांचा भिमनगर - भावसिंगपुरा येथील रस्ता आणि लालमाती पुलासाठी मंजूर झालेल्या ७१ लाखांच्या कामाला मनपा प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांनी कात्री लावली आहे. त्या आडकाठीतून मार्ग काढा आणि रस्ता व पुलाचे काम तातडीने सुरू करा, अन्यथा गावकऱ्यांसह मनपा प्रशासकांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा भिमनगर (दक्षिण) वार्ड क्र. १६च्या माजी नगरसेविका मनिषा विनोद लोखंडे यांनी थेट मनपा प्रशासकांना दिला आहे. 

भिमनगर - भावसिंगपुरा वार्ड क्रमांक - १६ अंतर्गत साई कंपाऊंड ते स्लास्टर हाउस पर्यंत (भावसिंगपुरा स्मशानभूमी रोड) या रस्त्याची अवस्था अतिशय खराब झालेली आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. प्रत्येक पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचून चिखल होतो. यामुळे रस्त्यावर चालणे सुध्दा कठीण झालेले आहे.

याच रस्त्याच्या कडेला भावसिंगपुरा गावाची स्मशानभूमी असून, नागरिकांना अंतयात्रा घेऊन जाता येत नसून, अनेक वेळा खड्ड्यातील चिखलात स्वर्गरथ अडकून पडल्यामुळे दुःखात असलेल्या मृताच्या नातेवाईकांना स्वर्गरथाला धक्का मारत चिखलातून बाहेर काढण्यासाठी मोठी ताकद लावावी लागत आहे. अनेकदा स्वर्गरथ खड्ड्यात अडखळत असल्याने प्रेत पाण्यात पडून विटंबना होत असल्याचा आरोप लोखंडे यांनी केला आहे. 

उप अभियंत्यावर गुन्हा दाखल

मृतदेहाची विटंबना होत असताना देखील या महत्त्वाच्या रस्त्याच्या दुरुस्तीकडे कानाडोळा करणाऱ्या वार्ड उप अभियंता के. एन. काटकर यांच्यावर छावणी पोलिस ठाण्यात गावकऱ्यांनी गुन्हे देखील दाखल केल्याचे लोखंडे यांनी सांगितले. 

भिमनगर - भावसिंगपुरासह परिसरातील शेकडो वसाहतींना जोडणारा मुख्य रस्ता आहे. औरंगाबाद - धुळे मार्गावरून मिटमिटा फाटा ते बीबी का मकबरा, सोनेरी महल, विद्यापीठ, पानचक्की, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद लेणी आदी पर्यटन स्थळांकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने देशी - विदेशी पर्यटकांची वाहने याच मार्गाने जातात. मात्र रस्त्याची बिकट वाट असल्याने नगरनाक्याकडून पर्यटकांना जावे लागत असल्याने कोंडीचा सामना करावा लागत आहे. 

प्रशासनाला पाझर फुटेना

यासंदर्भात अनेक वेळा मनपा प्रशासनाकडे लेखी निवेदने दिली. अनेकदा स्मरणपत्रे दिली. रास्ता रोको आंदोलने केली, मात्र प्रशासनाने जराही दखल घेतली नसल्याची खंत लोखंडे यांनी व्यक्त केली आहे. या रस्त्याचे काम व्हावे यासाठी गावकरी रोष व्यक्त करत आहे. मी गावकऱ्यांची समजूत काढताना हतबल झाल्याचे लोखंडे सांगतात.

३० मीटरचा रस्ता झाला १५ मीटर

मनपाच्या विकास आराखड्यात साई कंपाऊंड ते राजे संभाजी चौकापर्यंतचा रस्ता ३० मीटरचा आहे. तसेच संभाजी चौक ते स्लास्टर हाउस पर्यंत २४ मीटरचा आहे. मात्र गत ४० वर्षात मनपाने विकास आराखड्यानुसार रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण न केल्याचा फायदा घेत अनेक नागरिकांनी मनपातील क्षेत्रीय अधिकाऱ्याच्या नाकावर टिच्चून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याने हा रस्ता कुठे १५ ते कुठे १० मीटर शिल्लक आहे. मनपाने विकास आराखड्यातील नकाशानुसार रस्त्याची मार्कींग करून तातडीने काम सुरू करावे, अशी मागणी मागील पाच वर्षांपासून त्यांनी तत्कालीन मनपा आयुक्त डाॅ. विनायक निपुन, ओमप्रकाश बकोरीया, ते आस्तिकुमार पांण्डेय यांच्याकडे लाऊन धरली होती.

पाऊन कोटी मंजूर; रस्ता कागदावर

वारंवार रस्ता दुरुस्तीची मागणी करत असलेल्या या महिला नगरसेविकेच्या तक्रारीची दखल घेत तत्कालीन मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी या रस्त्यासाठी २०१६ - १७ च्या अर्थसंकल्पात पाऊन कोटीचा निधी मंजूर केला होता. सर्वसाधारण आणि स्थायी समितीच्या मंजुरीने ठराव पास करत सिमेंट रस्त्यासाठी टेंडरदेखील काढण्यात आले होते. निवड झालेल्या कंत्राटदाराला अधिकाऱ्यांकडून वर्क ऑर्डर देखील देण्यात आली होती. मात्र पुढे निधी नसल्याचे कारण पुढे करत हे कामच रद्द करण्यात आले. परिणामी रस्त्याचे काम पाच वर्षे झालेच नाही.

आस्तिककुमार पाण्डेय यांची सायकल सफर

लोखंडे यांचा सातत्याने पाठपुरावा पाहून तत्कालीन मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी गत अतिवृष्टीत भर पावसात या रस्त्याची पाहणी केली. चिखलात हरवलेला रस्ता आणि याच वार्डांतर्गत लालमाती, निसर्ग काॅलनी येथील नाल्यावर पावसाचे पाणी वाहताना त्यांना दिसले. पुलाच्या डोक्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे नागरिक जीव धोक्यात घालून या पुराच्या पाण्यातून ये - जा करताना त्यांनी प्रत्यक्ष पाहिले. यावेळी मुलांना शाळेत जाता येत नाही, पावसाळ्यात पुलावरून सारखे पाणी वाहत असल्याने वसाहतींचा संपर्क तुटतो, रुग्णांची गैरसोय होते, रोजगारावर परिणाम होतो. अशा अनेक प्रतिक्रियांची नोंद घेत पाण्डेय यांनी लालमाती पुलासाठी ७१ लाख रुपये व भिमनगर - भावसिंगपुरा रस्त्यासाठी ७ कोटी रूपये मंजूर करत स्मार्ट सिटी योजनेत या दोन्ही कामांचा समावेश करण्यात आला होता. 

नवनियुक्त प्रशासकांची कामांना कात्री

नवनियुक्त आयुक्तांनी ३१७ कोटींमध्ये १११ रस्त्यांऐवजी केवळ ८८ कोटीत २२ रस्ते तयार करण्याचा निर्णय घेत इतर रस्त्यांच्या कामांना कात्री लावली आहे. त्याच कात्रीत हा रस्ता अडकल्याने आता लोखंडे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.