New Beed Bypass
New Beed Bypass Tendernama
मराठवाडा

गडकरींनी उद्घाटन केलेल्या 613 कोटींच्या 'या' रस्त्याची लागली वाट

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : ठेकेदाराने (Contractor) निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले, त्यात पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य उतार केला नाही. वॉटर ड्रेनिंग सिस्टिम कचऱ्यात अडकली म्हणून पावसाचे पाणी रस्त्यावर साचते. 'टेंडरनामा'च्या वृत्तानंतर दुरुस्ती केली. पण काही महिन्यातच हा रस्ता पुन्हा खराब झाला. छत्रपती संभाजीनगर शहरालगतचा सर्वाधिक जड वाहतुकीचा रस्ता म्हणून ओळखला जाणारा हा नवा बीड बायपास अनेक ठिकाणी उखडल्याने खराब झाला आहे.

सध्या रस्त्यावर आडगाव उड्डाणपुलाखालच्या जोड रस्त्यावरील मोठी भगदाडे पडल्याने व पावसाचा चिखल झाल्याने कधीही एखादे मोठे वाहन खचू शकते, अशी स्थिती आहे. चार महिन्यांपूर्वी भारतीय राष्ट्रीय महामार्गाने ठेकेदारामार्फत या रस्त्याच्या प्रत्येक उड्डाणपुलांखालचे रस्ते दुरूस्त केले होते. खराब झालेल्या डांबरी रस्त्याच्या जागी काॅंक्रिटीकरण केले, पण त्यातही निकृष्ट काम केल्याने रस्त्यावर भेगा पडल्या. याउलट वाॅटर ड्रेन सिस्टीमवर बारदाना टाकून त्याने रस्त्याच्या विद्रूपीकरणात भर आहे. 

आडगाव, गांधेली, देवळाई, सातारा, वळदगाव, कांचनवाडी, वाळूज ते करोडी या बीड बायपास रोडचे (New Beed Bypass) काम नोव्हेंबर २०२१ अखेरपर्यंत पूर्ण झाले होते. शहरातील जुना बीड बायपास हा दोन पदरी धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरच होता. मात्र बीडबायपासच्या दोन्ही बाजूने वसाहतींचा आवाका वाढल्याने हा मार्ग सातारा - देवळाईच्या डोंगरातून काढण्यात आला. हा मार्ग शहराबाहेरून म्हणजे आडगाव ते करोडी असा ३० किलोमीटर लांबीचा आहे. दरम्यान नोव्हेंबर महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले होते. मात्र जुन्या बीड बायपासचे काम चालू केल्याने लोकार्पनाआधीच तो वाहतुकीसाठी  खुला करण्यात आला होता.

आडगाव, गांधेली, देवळाई, सातारा, कांचनवाडी, वळदगाव, करोडी, माळीवाडा असा हा मार्ग आहे. या नवीन बायपासचे काम २०१८  मध्ये सुरू झाले होते. ऑगस्ट २०२१ पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत ठेकेदाराला दिलेली होती. मात्र, कोरोनामध्ये मजूर, अभियंते आपापल्या गावी गेल्याने हे काम रखडले होते. त्यामुळे एनएचएआयने ठेकेदाराला तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती. शेवटी नोव्हेंबरअखेरपर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण झाले होते.

या रस्त्यावर लहान-मोठे एकूण ११२ पूल आहेत. तसेच कांचनवाडी, एएसक्लब येथील दोन्ही उड्डाणपूलाखालील जोड रस्त्यांची खड्डेमय अवस्था झाली आहे. या संपूर्ण महामार्गाच्या बांधकामासाठी एकूण ६१३ कोटी रुपये खर्च झाला आहे. रस्त्यावरील कांचनवाडी ते करोडीपर्यंत सर्व्हिस रोडची देखील खड्डेमय अवस्था तशीच आहे. तर आडगाव, गांधेली, देवळाई, सातारा, एसआरपीएफ कँप, वाळूज लिंक रोड, तिसगाव चौफुली, करोडी येथील भुयारी मार्गात खंड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. 

भर पावसाळ्यात या पुलांच्या खालचे रस्ते आणि भुयारी मार्गात खंड्डे पाण्याने भरल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उड्डाणपुलांच्या खालचे रस्ते खचल्याने  या रोडवरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना धूळ आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यामुळे अपघातदेखील घडत आहेत.

तीन वर्षांपूर्वी सुमारे ६१३  कोटी रुपये खर्चून हा रस्ता तयार करण्यात आला. 'टेंडरनामा'च्या वृत्तमालिकेनंतर त्याची डागडुजी केली. तरीही रस्ता खचण्याचे प्रकार सुरूच आहेत. ठेकेदार आणि अधिकारी दर्जेदार साहित्य वापरून रस्त्याचे काम केल्याचा दावा करतात. मग रस्त्याची अवस्था अशी का होते, याचा शोध घेण्यासाठी या रस्त्याची केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केंद्राचे पथक पाठवने गरजेचे आहे.