Ravindra Chavan
Ravindra Chavan Tendernama
कोकण

Mumbai-Goa Highway : 'इंदापूर ते झाराप रस्त्याची कामे लवकर करा'

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) इंदापूर ते झाराप मार्गावरील प्रलंबित राहिलेली रस्त्याची कामे युध्दपातळीवर पूर्ण करुन येत्या पावसाळ्यापूर्वी किमान दोन पदरी रस्ता पूर्णपणे तयार करण्यात यावा. यामध्ये रायगडमधील पळस्पे ते इंदापूर, रत्नागिरीमधील अरवली ते वाकेड व कशेडी घाटातील प्रलंबित रस्त्यांचा समावेश असून ही सर्व रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावीत असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी दिले आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व आरामदायी व्हावा यादृष्टीने प्रलंबित रस्त्यांची कामे युध्दपातळीवर पूर्ण करा. या महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास होऊ नये यादृष्टीने सर्व कामे अपूर्ण कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावी अशा सूचनाही मंत्री चव्हाण यांनी यावेळी दिल्या. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी नवी मुंबई येथील कोकण भवनमधील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रगतीचा आढावा घेतला. या बैठकीला राष्ट्रीय महामार्गाचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गुहागर चिपळूण कराड रस्त्याच्या चिपळूण तालुक्यातील पिंपळी बुद्रुक ते कुंभार्ली घाटमाथा (हेळवाक) एकूण २१. किमी या भागाचे दुपदरीकरण आणि उन्नतीकरणाचा प्रस्ताव मंजूर करुन हे काम चालू वर्षाच्या वार्षिक आराखड्यामध्ये समाविष्ट करुन रस्त्याची कामे मार्गी लावण्याच्या सूचना मंत्री चव्हाण यांनी मुख्य अभियंता, रस्ते परिवहन मंत्रालय व मुख्य अभियंता, राष्ट्रीय महामार्ग यांना दिल्या. चिपळूण पागनाका (७०० मी.) व सावर्डे शहरामध्ये उड्डाण पुलाचा (१२५० मी.) प्रस्ताव चालू वर्षाच्या वार्षिक आराखड्यामध्ये समाविष्ट करुन उड्डाण पुलांची कामेही मार्गी लावण्याच्या सूचना मंत्री चव्हाण यांनी या बैठकीत दिल्या.

कोकणातील महामार्गांवरील प्रलंबित रस्त्यांच्या कामांना अग्रक्रम देण्याच्या दृष्टीने खालील कामे चालू वर्षाच्या वार्षिक आराखड्यामध्ये मंजूर करुन घेऊन चालू आर्थिक वर्षात ही कामे सुरु करण्याचे निर्देशही मंत्री चव्हाण यांनी दिले. या कामांमध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबाग वडखळ रस्ता ००.०० ते २२.२००  चे महामार्ग दर्जाच्या स्तराला उन्नतीकरण करणे. त्याचप्रपमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे गगनबावडा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ जी चे व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६.३७ कि.मी. लांबीचे काम मंजूर असून उर्वरीत १४.३० कि.मी. चे उन्नतीकरण करण्याच्या सूचनाही मंत्री चव्हाण यांनी या बैठकीत दिल्या.