Railway Track Tendernama
कोकण

NHAI - कोकण रेल्वेमध्ये ऐतिहासिक करार! पायाभूत सुविधांच्या विकासाला गती

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): देशातील पायाभूत सुविधांचा विकास अधिक वेगाने आणि एकात्मिक पद्धतीने करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रेल्वे मंत्रालयांतर्गत असलेल्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी एका महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारामुळे रस्ते आणि रेल्वे या दोन्ही क्षेत्रांतील तांत्रिक कौशल्याचा एकत्रित वापर करून देशाच्या दळणवळण व्यवस्थेला नवी दिशा मिळणार आहे.

नवी दिल्ली येथील एनएचएआयच्या मुख्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात एनएचएआयचे अध्यक्ष संतोष कुमार यादव आणि दोन्ही संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या करारावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

या सहकार्याचा मुख्य उद्देश उपलब्ध संसाधनांचा सर्वोत्तम वापर करणे आणि परस्परांना फायदेशीर ठरतील अशा संधी शोधणे हा आहे. या दोन मोठ्या संस्था एकत्र आल्यामुळे भारताच्या पायाभूत सुविधांना बळकटी मिळण्यासोबतच संपर्क सुविधा म्हणजेच कनेक्टिव्हिटीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या करारानुसार, राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे पायाभूत सुविधांच्या एकात्मिक विकासासाठी एक व्यापक आराखडा तयार केला जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने रेल्वे-आणि-रस्ते पूल, बोगदे, मल्टी-मोडल लॉजिस्टिक पार्क्स आणि इंटर-मोडल हब विकसित करण्यावर भर दिला जाईल.

विशेषतः ज्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग रेल्वे मार्गांना छेदतात किंवा त्यांच्या समांतर धावतात, अशा ठिकाणी अत्याधुनिक 'ग्रेड सेपरेटर' म्हणजेच स्तरिय विभाजक उभारण्याचे नियोजन आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

केवळ बांधकामेच नव्हे, तर जिथे शक्य असेल तिथे सामायिक उपयोगिता कॉरिडॉर विकसित करण्याची संकल्पनाही या करारात मांडण्यात आली आहे.

हा सामंजस्य करार सुरुवातीच्या पाच वर्षांच्या कालावधीसाठी वैध राहणार असून, या काळात दोन्ही संस्था आपापले तांत्रिक कौशल्य आणि सामर्थ्य पणाला लावून विकासकामांना गती देतील. एनएचएआय आणि कोकण रेल्वेचे हे पाऊल भविष्यातील आधुनिक भारताच्या उभारणीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे.