Parshuram Ghat, Mumbai - Goa
Parshuram Ghat, Mumbai - Goa Tendernama
कोकण

Mumbai-Goa महामार्गासाठी शेवटची डेडलाईन; अन्यथा कठोर कारवाई

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : राज्य सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुंबई- गोवा महामार्गावरील सर्व कामे पूर्णत्वास जातील असे आश्वासन मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहे. या आश्वासनावर राज्य सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला न्यायालयाने सक्त ताकीद दिली असून, यापूर्वी दोन वेळा मुदतवाढ घेऊन कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे यावेळी कामे पूर्ण न झाल्यास त्याची गांभीर्याने दखल घेत न्यायालयाचा अवमान केल्याप्रकणी कठोर कारवाई करू असा इशाराही दिला.

मुंबई-गोवा महामार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली रस्त्यांची कामे ३१ डिसेंबर २०२३ पूर्वी पूर्ण होतील, असे केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून सांगण्यात येत होते. मात्र, ती मुदतही टळून गेली. पर्यावरणविषयक परवानग्या मिळण्यास झालेला उशीर, भूसंपादनाची रखडलेली कामे, कंत्राटदारांची निष्क्रियता आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे महामार्गाची कामे रखडली आहेत. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग (राष्ट्रीय महामार्ग 66) च्या रुंदीकरण आणि दुरुस्तीच्या कामांसह इतर सर्वच गोष्टींची कामे 31 डिसेंबर 2024 च्या आत पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. मुंबई गोवा महामार्गावरील कामात होणाऱ्या विलंबाबात वकील ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना बुधवारी न्यायालयाने राज्य सरकारला खडसावले.

मुंबई-गोवा महामार्गाची सध्यस्थिती
आरवली येथील गड नदीवरील पूल आणि संगमेश्वर येथील सोनवी नदीवरील पुलाचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. त्याचबरोबर संगमेश्वरपासून सुमारे १७ किलोमीटर अंतरावर सप्तशृंगी नदी आणि २० किलोमीटर अंतरावरील बावनदी येथील पुलांचेही काम अपूर्ण अवस्थेत आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण झाली नाहीत तर हे वर्षअखेर उजाडेल, अशी शक्यता आहे. त्याचप्रमाणे निवळी घाटातील कामही बऱ्याच प्रमाणात बाकी आहे. तेथून पुढे लांजापर्यंतचे काम वेगाने पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. पण प्रत्यक्ष लांजा बाजारपेठेतील उड्डाण पूल रखडला आहे. चिपळूणजवळ परशुराम घाटातील धोकादायक आणि आव्हानात्मक कामही पावसाळ्यानंतर झपाट्याने पूर्ण होत आले असून घाटातील दोन्ही मार्गिका लवकरच पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे. पण चिपळूण येथील बहादूर शेख नाक्याजवळ उड्डाण पुलाच्या बांधकामाचे गर्डर गेल्या ऑक्टोबर महिन्यात कोसळून झालेल्या अपघातामुळे या टापूतील कामाचे वेळापत्रक एक वर्षाने पुढे गेले आहे.