मुंबई (Mumbai) : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाट येथील प्रतीक्षेत असलेले दोन्ही बोगदे येत्या प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार आहेत. गेल्या 18 वर्षांपासून या बोगद्यांची प्रतीक्षा होती. त्यामुळे 45 मिनिटांचे अंतर आता 8 मिनिटात कापता येणार आहे.
कशेडी येथील पहिल्या बोगद्यातून दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरळीत सुरू आहे. दुसऱ्या बोगद्यात तात्पुरत्या स्वरूपातील वीजपुरवठा कार्यान्वित करण्यात आला होता. कायमस्वरूपी वीजपुरवठ्यासाठी विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. विद्युतीकरणाची कामे पूर्ण झाल्यावर दोन्ही बोगदे पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले होतील. कशेडी येथील दुसऱ्या बोगद्यात आता पंखे बसविण्याचे काम हाती घेण्यात आले असून रायगडमधील भोगावजवळ एका पुलावर स्लॅब टाकण्याचे कामही सुरू आहे.
मुंबई गोवा महामार्गावर असलेला कशेडी घाट अवघड व धोकादायक म्हणून ओळखला जातो. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाट येथील प्रतीक्षेत असलेले दोन्ही बोगदे प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार आहेत. कशेडी घाटाला पर्याय म्हणून येथील दोन्ही बोगद्यांचे काम प्रगतीपथावर आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या भाविकांसाठी एक बोगदा सुरू करण्यात आला होता. मात्र त्यांनतर काही त्रुटी आढळल्याने दोन्ही बोगदे बंद करण्यात आले होते. मुंबई-गोवा हा महामार्ग कोकणवासीयांसाठी महत्वाचा आहे. 503 किलोमीटरचा महामार्ग कोकणातून जातो. मुंबईत कोकणातील लाखो नागरिक राहतात. ते गणपती, होळी किंवा इतर वेळी गावी येत जात असतात. त्या काळात रेल्वे आरक्षण फुल्ल असते. त्यामुळे त्यांच्यासाठी रस्ते प्रवास सोयीचा होतो. परंतु महामार्गाचे काम पूर्ण नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणी येतात. परंतु आता ही अडचण दूर होणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील दोन्ही बोगदे येत्या 26 जानेवारीपासून पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिली.