Vashi Bridge
Vashi Bridge Tendernama
कोकण

'या' पुलामुळे अलिबाग, नवी मुंबई येणार आणखी मुंबईजवळ; 900 कोटींचे

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) रेवस-रेड्डी या सागरी महामार्गावर असलेल्या धरमतर खाडीवरील रेवस ते उरणनजीकच्या करंजा बंदराला जोडणारा सागरी पूल बांधकामाचे ८९७ कोटींचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. रेवस ते करंजा हा पूल २ किमी लांबीचा असणार आहे, त्यामुळे अलिबाग आणि नवी मुंबई, मुंबई आणखी जवळ येणार आहे. ठेकेदारास ३६ महिन्यात हे काम पूर्ण करायचे आहे.

सध्या रेवस-कारंजा ये-जा करण्यासाठी वाहनधारकांना ७० किमीचा प्रवास रस्त्याने करावा लागतो. यात दोन तासांचा वेळ लागतो, तर जलवाहतुकीसाठी दोन ठिकाणांदरम्यान १५ मिनिटे लागतात. मात्र, पावसाळ्यात फेरी सेवा बंद असल्याने प्रवास करणे जिकीरीचे होते. रस्ते विकास मंडळाने ही अडचण लक्षात घेऊन अलिबागला थेट नवी मुंबई-मुंबईशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. हा रेवस ते करंजा हा पूल २ किमी लांबीचा असणार असून, त्याच्या दोन्ही बाजूला ३ किमी लांबीचे मार्ग असतील. शिवडी आणि रायगडमधील न्हावा-शेवाला जोडणारा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक कार्यान्वित झाल्यानंतर, हा रेवस-कारंजा पूल अलिबाग आणि मुरुडसह कोकणाकडे जाणाऱ्या पर्यटकांना खूप महत्त्वाचा ठरणार आहे.

या पुलामुळे अलिबाग थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह जेएनपीटीला जोडले जाणार आहे. त्यामुळे अलिबाग आणि नवी मुंबई व मुंबईचे अंतर कमी होऊन प्रवाशांचा वेळ, पैसा, श्रम याच्यासह प्रदूषण कमी होऊन इंधनाची बचत होणार आहे. रेवस आणि कारंजाला जोडणारा चार पदरी खाडी पूल बांधण्यासाठी एमएसआरडीसीने एप्रिल २०२२ मध्ये रिक्वेस्ट फॉर क्वालिफिकेशनसाठी टेंडर प्रसिद्ध केले होते. त्यानंतर आता हा पूल बांधण्याची टेंडर प्रक्रिया महामंडळाने १९ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू केली आहे. महामंडळ या पुलावर ८९७ कोटी खर्च करणार आहे. सर्व आवश्यक परवाने मिळाल्यानंतर पूलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी ठेकेदारास ३६ महिन्यांची मुदत देण्यात येणार आहे.