आळंदी (Alandi) : पुणे-आळंदी रस्त्यावर देहूफाटा येथे गेल्या अडीच वर्षाहून अधिक काळ दररोज चेंबर तुंबल्याने मैलायुक्त सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. विद्यार्थी, कामगार, आणि वाहनचालकांना दररोज सकाळी नाक दाबून रस्त्यातून वाट काढावी लागत असल्याचे चित्र आहे.
आळंदी नगरपरिषद हद्दीत देहूफाटा येथून देहू, भोसरी, पुणे, चाकण आणि आळंदी अशा चारही ठिकाणी जाण्यास रस्ता आहे. मुख्य वर्दळीचा रस्ता असल्याने दररोज वाहनांची गर्दी असते. अनेकदा वाहतूक कोंडीही होते. अशातूनच वाट काढत विद्यार्थी कामगार जातात. मात्र या ठिकाणी दररोज सांडपाणी रस्त्यावरून वाहत असते.
दररोज तीनचार तास सांडपाणी वाहते. यामुळे नागरिकांना नाक दाबून चालावे लागतेच. तसेच हेच सांडपाणी एखाद्या चारचाकी वाहनांमुळे अंगावर उडू नये याची दक्षताही घ्यावी लागते. तरीही अनेकदा सांडपाणी अंगावर उडून कपडे खराब होतात.
आळंदी नगरपरिषद आरोग्य विभागाने आत्तापर्यंत अनेकदा याठिकाणी चेंबर दुरुस्ती केली. मात्र चेंबर का तुंबते याचा छडा मात्र अद्याप नगरपरिषदेला लागला नाही. परिणामी अखंड सांडपाणी रस्त्यावर वाहत असते.
नगरपरिषद आणखी किती वेळ चेंबर दुरुस्तीसाठी घालवणार आहे? हाच खरा प्रश्न आहे. खरे तर दररोज एकाच चेंबरमधून सांडपाणी तुंबल्यामुळे वाहत आहे, ही आरोग्य विभागाची नामुष्कीच म्हणावी लागेल.