Aurangabad
Aurangabad Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : सिडको, एन-४ मधील रस्त्याचा २७ लाखांचा निधी गेला कुणीकडे?

संजय चिंचोले

औरंगाबाद (Aurangabad) : सिडको, एन् -४, सेक्टर "सी" विसावा शिशु गार्डन समोरचा रस्ता सिडकोचे महापालिकेकडे हस्तांतरित झाल्यापासून गेल्या १६ वर्षांपासून आजतागायत दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे सदर रस्त्यावर अक्षरशः पाण्याचे डोह तयार झाले असून जेष्ठ नागरिक आणि लहान मुलांना रस्त्यावरुन चालणे जिकिरीचे झाले आहे.

हा रस्ता चांगल्या स्थितीत व्हावा म्हणून येथील नागरिकांनी वेळोवेळी स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार यांना तसेच संबंधित प्रभाग अभियंत्यापासून महापालिका प्रशासकांपर्यत अनेक वेळा तोंडी आणि लेखी निवेदन दिले आहेत. यावेळी रस्त्यासाठी  महानगर पालिकेच्या अर्थसंकल्पात तुमच्या रस्त्यासाठी  २७ लाख रूपये ठेवण्यात आल्याचे पालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधी सांगतात. मात्र गत १६ वर्षापासून रस्ता जैसे थे असल्याने २७ लाख रूपये गेले कुणीकडे ? असा प्रश्न येथील नागरीकांना पडला आहे. 

नागरिकांनी लोकसहभागातून फुलवले नंदनवन पण...

सिडको एन-४ भागात सिडकोच्या विकास आराखड्यातील जवळपास पावनेदोन एकर जागा उद्यानासाठी आरक्षित ठेवण्यात आली होती. सिडकोचे महापालिकेत हस्तांतर झाल्यानंतर या उद्यानाची वाट लागली. याभागातील नागरीकांनी एकत्र येत येथे मोठी वृक्षसंपदा तयार केली. त्याला विसावा शिशु गार्डन असे नाव देण्यात आले. याच उद्यानाशेजारी  शेजारी राहणारे कै. गंगाराम भिमराव जगताप यांच्या स्मरणार्थ २ जुन २०२० रोजी  उद्यानात मनोज बोरा (मामाजी) व लायन्स क्लब राॅयल, औरंगाबाद यांच्या तर्फे उद्यानात  लहान मुलांना खेळतांना त्रास होऊ नये म्हणून खेळण्याच्या जागेवर कच टाकण्यात आला, खेळाच्या साहित्याची रंगरंगोटी करण्यात आली, गार्डनच्या भिंती आणि झाडांच्या बुंध्याला रंग देण्यात आला आणि गार्डन मधील झाडांना पाणी देण्यासाठी कै.गंगारामजी जगताप यांच्या स्मरणार्थ २००० लिटरची पाण्याची टाकी देण्यात आली.

लोकप्रतिनिधींना पडला विसर

लोकसहभागातून झालेल्या विकासकामांचा छोटेखानी समारंभात आर. एस. एस. चे अनिल भालेराव, खा. तथा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, आमदार तथा सहकार राज्यमंत्री अतुल सावे, आमदार तथा  विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी आमदार सुभाष झांबड, माजी महापौर नंदकुमार घोडेले, जेष्ठ पत्रकार चंद्रकांत दळवी, शिक्षण महर्षी डॉ.बाळासाहेब पवार, माजी उपमहापौर प्रमोद राठोड, शिवसेना शहर प्रमुख राजू वैद्य, माजी नगरसेवक भाऊसाहेब जगताप आणि स्थानिक माजी नगरसेविका  माधूरी अदवंत (देशमुख), याच कार्यक्रम सोहळ्यात  सी सेक्टर च्या नागरिकांनी विसावा शिशु गार्डन समोरचा रस्ता तातडीने करण्याची मागणी केली होती. तसे लेखी निवेदन राज्यमंत्री अतुल सावे , आणि  केंद्रीय मंत्री डाॅ.भागवत कराड यांना देण्यात आले होते. त्यांनी लवकरात लवकर काम करून देण्याचे आश्वासन मात्र हवेतच विरले.

अजुनही होत्या काही मागण्या

या रस्त्या व्यतिरिक्त गार्डन मध्ये जेष्ठ नागरिकांना सुखरूप बसण्यासाठी २० बाकडे, गर्दुल्ले व इतर अनाहूत लोकांकडून गार्डनच्या सुरक्षेसाठी गार्डन च्या भिंतीवर उंच जाळी तयार करून मिळावी व इतर मागण्यांचा समावेश असलेले निवेदन देण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या  ८ दिवसांनंतर कराड यांना केंद्रीय मंत्रीपद तर सावे हे राज्यमंत्री झाल्याने सी सेक्टरच्या सर्व रहिवास्यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी यादोन्ही मंत्री महोदयांवर शुभेच्छांचा वर्षाव देखील केला. तथापि आजतागायत सेक्टर सी मधील विसावा शिशु गार्डन समोरचा रस्ता चांगल्या स्थितीत कधी होईल आणि मंत्री महोदयांचे पाऊल या रस्त्यावर कधी पडतील याची वाट सेक्टर सी चे रहिवासी आतुरतेने पाहत आहे.