Aurangabad
Aurangabad Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : सिडकोत भरला समस्यांचा बाजार; साथरोगाने नागरिक बेजार

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : सिडको एन-६ संभाजी कॉलनी भागातील एफ सेक्टरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची उंची मोठी केल्याने व दुसऱ्या गल्लीत जाण्यासाठी उपाययोजना केलेल्या नाहीत. विद्युत खांब घराला लागून आहेत. ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी खोदलेला रस्ता दुरुस्त न करता अर्धवट सोडल्याने पाण्याची तळी साचत आहेत.याशिवाय परिसरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले असून नळांवाटे दूषित पाण्याची समंस्या पाचवीलाच पूजली असल्याचा आरोप रिपाई खरात गटाचे जिल्हाध्यक्ष मनिष नरवडे यांनी केला आहे.

संभाजी कॉलनीत गेल्या काही महिन्यांपासून समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. आमदार अंबादास दानवे यांच्या पाठपूराव्याने १० लाख रुपये खर्च करून रस्त्याचे काम केले. परंतु रस्त्याची उंची मोठी केल्याने एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जाता येत नाही. त्यासाठी शोल्डर फिलींग ही महत्वाची उपाययोजना केली नाहीत. एन-६ स्मशानभूमीसमोरील मुख्य रस्ता ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी खोदण्यात आला. परंतु, तेथे दुरुस्तीचे काम न केल्याने पाण्याचे तळे साचले आहे. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग आहेत. याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांनी प्रशासनाला कळवले आहे मात्र अजूनही समस्या कायम आहे.

काय म्हणतात नागरिक

ड्रेनेजलाइनसाठीचा खोदलेल्या रस्त्याचे काम करावे

स्मशानभुमीसमोर सिमेंटचा मुख्य रस्ता ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी खोदला. त्यानंतर रस्ता दुरूस्त न करता सोडण्यात आला. यामुळे पाण्याचे तळे साचले जाते. याठिकाणचा रस्ता सोयीचा करावा.

- मनीष नरवडे, रहिवासी

संभाजी कॉलनीत ठिकठिकाणी कचरा

संभाजी कॉलनीत अनेक ठिकाणी कचरा पडून दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. याठिकाणी नियमित फवारणी करून कचऱ्याची समस्या सोडवली पाहिजेत.

- अनिल शेजवळ - रहिवासी

विद्युत तारांचा प्रश्न मार्गी लावावा

संभाजी कॉलनी एफ सेक्टरमध्ये घराला खेटून विद्युत खांब असून तारांचे जाळे पसरल्याने धोका वाढला आहे. अनेकदा तक्रार करूनही वीज वितरण अधिकारी याकडे दूर्लक्ष करत आहेत.

- पुष्पा खंडारे, रहिवासी

गल्ल्यांमध्ये जाण्यासाठी सोयीचा रस्ता करावा

लाखो रूपये खर्च करून रस्त्याचे काम केले. परंतु रस्त्याची उंची मोठी झाल्याने दहा ते बारा गल्ल्यांमधील लोकांचा प्रश्न निर्माण झाला. कंत्राटदाराला सांगूनही रस्त्याची उंची मोठी झाली. यामुळे गल्ल्यांमध्ये जाण्यासाठी सोयीचा रस्ता करावा.

- सचिन पाटील

नाले सफाई तात्काळ करावी

मथुरानगर चौकात नाल्याची साफसफाई न केल्यामुळे वाहन धारकांना आणि पादचाऱ्यांना गुडघाभर पाण्यातून वाट काढत कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.

- अनिता साळवे