home
home tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : 'समृध्दी'मुळे घराला तडे गेलेल्या शेतकऱ्याची भरपाईसाठी आठ महिन्यांपासून पायपीट

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : मुंबई ते नागपूर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे ६२५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून उर्वरित ८५ किलोमीटरचे काम जुलैपर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, हा मार्ग उभारताना आजूबाजूच्या घरांना तडे जाऊनही त्या नागरिकांना त्याची नुकसान भरपाई दिली जात नाही, खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती केली जात नाही, उपरस्त्यांचे काम केले जात नाही, अशा अनेक तक्रारी आहेत. इगतपुरी तालुक्यातील धामणी येथील एका शेतकर्याच्या घराला तडे जाऊनही नुकसान भरपाई मिळत नसल्याने अखेर या शेतकऱ्याने अखेर जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

समृद्धी महामार्गापासून २०० मीटर अंतरावर इगतपुरी तालुक्यातील धामणी शिवारात निवृत्ती भोसले यांचे घर आहे. या महामार्गासाठी त्या परिसरात तीन वर्षे खडक फोडण्यासाठी स्फोट घडवण्यात आहे. या स्फोटांमुळे भोसले यांच्या घराला तडे गेले आहेत. याबाबत भोसले यांनी संबंधित ठेकेदार कंपनी व  महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अभियंत्यांनी १ ऑगस्ट २०२३ ला भोसले यांच्या घराचा पंचनामा केला.

त्यानंतर त्यांच्याशी कोणाही अधिकारी अथवा ठेकेदार कंपनीच्या संबंधितांनी संपर्क साधाला नाही. एवढेच नाही, तर पंचनाम्यानंतर त्या नुकसानीच्या मूल्यांकनाची प्रत देखील त्यांना मिळालेली नाही. यासाठी भोसले यांचा आठ महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे, पण प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने नैराश्‍य येत असल्याचे सांगत त्यांनी १० एप्रिलपर्यंत नुकसान भरपाई न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे. त्यास कार्यकारी अभियंता विश्‍वनाथ सातपुते व राज कंपनीचे व्यवस्थापक दत्तात्रय माने हे जबाबदार असतील, असेही त्यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.