Nashik Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : आता तरी येवला चौफुलीवरील वाहतूक कोंडी संपणार का?

मालेगाव- मनमाड- येवला- कोपरगाव रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव-येवला-मनमाड-मालेगाव या रस्त्याच्या चौपदरी काँक्रिटीकरणासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी १९ जून २०२५ रोजी ९८० कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. तसेच कोपरगाव-येवला-मनमाड-मालेगाव रस्त्यावरील पिंपळगाव जलाल येथील टोलची मुदत संपल्याने टोल बंद करण्यात आला असून, हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. या रस्त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू असून, त्यात येवला बाह्यवळण रस्त्याचा समावेश झाला आहे.

या बाह्यवळण रस्त्यामुळे येवला शहराबाहेरील चौफुलीवरील वाहतूक कोंडीची समस्या कायमची सुटणार आहे. दरम्यान हा निधी भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी मंजूर केला आहे. मात्र त्यावरून शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.

येवला शहरातून जाणारा कोपरगाव-येवला-मनमाड-मालेगाव रस्ता उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा प्रमुख महामार्ग आहे. या रस्त्याला येवला शहरात व्यापाऱ्यांचे शॉप आणि बाजारपेठ आहे. येवला शहरात या रस्त्यावर नेहमी वाहतून कोंडी होऊन वाहन चालक आणि प्रवाशांना त्रास होत असतो. शहरातील नागरिकांना तसेच विद्यार्थ्याना जीव मुठीत घेऊन महामार्ग ओलांडण्याची वेळ येते.

या ठिकाणी वारंवार अपघात होवून अनेकदा नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे बाभूळगांव -अंगणगांव-पारेगाव मार्गे येवला बाह्यवळण रस्त्याची मागणी आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने १९ जून २०२५ च्या अधिसूचनेनुसार एनएच १६० एच व एनएच ७५२ जी मधील कोपरगाव ते मालेगाव ७६ किमी चौपदरी काँक्रिट रोडसाठी ९८० कोटी निधी मंजूर केलेला आहे.

त्यानुसार या रस्त्यामध्ये येवला शहरात चौपदरी उड्डाणपूल आणि भूसंपादनासह बाह्यवळण रस्त्याचा डीपीआरमध्ये समावेश करून लवकरात लवकर या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल अंतिम करण्यात यावा, अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी केल्या आहेत.

या रस्त्यामुळे येवलेकरांची वाहतूक कोंडीतून मुक्ती होणार असून येवला हे नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, मालेगाव अशा विविध महानगरांना जोडणारा केंद्रबिंदू ठरणार आहे.

या महामार्गाच्या डीपीआरच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून, या रस्त्याच्या सविस्तर प्रकल्प अहवालात येवला शहरात चौपदरी उड्डाणपूल व बाह्य वळण रस्त्याचा समावेश करण्यात यावा, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री भुजबळ यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या मुख्य अभियंता व प्रकल्प संचालकांना केल्या आहेत.

श्रेयवादाची लढाई

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री भुजबळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांना पत्र व्यवहार करून येवल्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कोपरगाव-येवला-मनमाड-मालेगाव चौपदरी काँक्रिट रस्ता करण्यात यावा अशी मागणी केली होती. तसेच याबाबत माजी खासदार समीर भुजबळ यांनी दि.२१ मे २०२५ रोजी दिल्लीत गडकरी यांची भेट घेऊन येवला शहर वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी येवला बाह्यवळण रस्त्यासह कोपरगाव-येवला-मनमाड चौपदरी काँक्रिट रस्ता करण्याची मागणी केली होती अशी माहिती मंत्री भुजबळ यांच्या कार्यालयातून प्रसारित करण्यात आली आहे.

तर शिवसेनेचे कुणाल दराडे यांनी या महामार्गास निधी मंजूर करून येवल्यातील बाह्यवळण रस्त्याचा त्यात समावेश केल्याबद्दल केंद्रीय मंत्री गडकरी यांच आभार मानले आहेत. तसेच यासाठी खासदार भास्कर भगरे व आमदार किशोर दराडे यांनी मंत्री गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार केल्याचे म्हटले आहे. यामुळे या रस्त्यावरून राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू आहे.