Road
Road Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : रस्त्यावर खर्च केला 3.39 कोटी अन् उखडला अवघ्या दोन महिन्यातच

टेंडरनामा ब्युरो

भंडारा (Bhandara) : ग्रामीण भागातील रस्ते गुणवत्तापूर्वक व दर्जेदार करण्यासोबत गावे थेट मुख्य रस्त्यांना जोडण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आहे. या योजनेतून बांधण्यात आलेला आदिवासीबहुल परिसर असलेल्या रोंघा-लोहारा हा आठ किलोमीटरचा रस्ता मात्र अवघ्या दोन महिन्यात उखडला आहे. 3 कोटी 39 लाख रुपये खर्चाच्या या रस्त्यावर रोंघा-पिटेसुर दरम्यान तीन किलोमीटर अंतरात खड्डे पडले असून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

रोंघा-लोहारा या रस्त्याचे बांधकाम सुमारे दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत बांधकाम करण्यात आले होते. या मार्गावर सुमारे तीन किलोमीटरमध्ये रस्त्याची गिट्टी बाहेर आली असून जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्त्याची जाडीही अत्यंत कमी दिसून येत आहे. मुख्य रस्त्यांना जोडणारा हा रोंधा- पिटेसुर-लोहारा असा हा रस्ता असून पुढे हा कांद्री येथे तुमसर-रामटेक या राष्ट्रीय महामार्गाला मिळतो. दळणवळण सुरू होण्यापूर्वीच हा मार्ग दोन महिन्यातच बिनकामाचा ठरला न आहे. हे आदिवासी बहुल क्षेत्र असल्याने याबाबत तक्रार करण्याकरिता कोणीही पुढे येत नाही, त्याचा फायदा अधिकारी व ठेकेदारवर्ग घेत आहे. रस्त्याचे हाल होत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग गुणवत्तेबाबत स्वतःची पाठ थोपटून घेत आहे, हे येथे उल्लेखनीय बाब म्हणावी लागेल.

रेतीच्या टिप्परची वाहतूक :

बावनथडी नदीपात्रातून चोरटी रेती नागपूर येथे जाते. रेतीचे टिप्पर या रस्त्यावरून धावतात, अशी माहिती संबंधित खात्याने दिली. या रस्त्याची क्षमता 10 टन आहे. परंतु येथे 40 ते 50 टन रेती वाहतूक करणारे ट्रक धावतात. त्यामुळे या रस्त्यावर खड्डे पडले, असे सांगितले जात आहे. रोंघा हे गाव भंडारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व बांधकाम विभाग सभापती संदीप टाले यांचे आहे. ते काय दखल घेतात, हे आता महत्त्वाचे आहे. रोंधा-लोहारा-पिटेसुर या आठ किलोमीटर रस्त्यादरम्यान खड्डे पडलेल्या ठिकाणी पाहणी केली. या रस्त्यांची क्षमता दहा टन वाहतुकीचे असताना रेतीचे 40 ते 50 टन टिप्पर येथून धावतात. त्यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या संदर्भात यापूर्वीच आम्ही तक्रार नोंदविली आहे. आता पुन्हा जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व आरटीओकडे तक्रार करू. रस्ता दुरुस्त करण्यात येईल. अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल केळकर, कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना भंडारा यांनी दिली.