
पिंपरी (Pimpri) : पिंपरी-चिंचवड शहर झपाट्याने वाढत असताना येथील रेल्वे स्थानकांची अवस्था मात्र बिकट झाली आहे. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, कासारवाडी, दापोडी या रेल्वे स्थानकांवर साफसफाई, प्रवाशांसाठी सुविधा, पार्किंग, सुरक्षा व नियोजनाचा अभाव जाणवत आहे. येथून दररोज हजारो जण प्रवास करत असूनही त्यांना सुविधा मिळत नसल्याचे दृश्य आहे.
रेल्वे स्थानक आणि समस्या...
दापोडी : फलाटांवरील पादचारी पुलाच्या जिन्याखाली घुशींनी पोखरले आहे. तेथे मातीचे ढीग साचले आहेत. प्रवाशांना पिण्यासाठी पाणी नाही. दोन्ही फलाटांवरील वॉटर कूलर बंद आहेत. फलाटावरील फरशा खचल्या आहेत. बाकड्यांची मोडतोड झाली आहे. दिव्यांग व्यक्तींसाठीचे स्वच्छतागृह कुलूपबंद आहे. विशेष म्हणजे, रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यासाठी पक्का रस्ता नाही. उखडलेल्या रस्त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. स्थानक परिसरात कचरा पडलेला आहे. दैनंदिन स्वच्छता होत नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
कासारवाडी : येथे प्रवेश करतानाच गैरसोयींना सामोरे जावे लागते. मुख्य प्रवेशद्वारावरच वाहने लावली जातात. त्यामुळे पायी येणाऱ्या प्रवाशांना रस्ता सापडत नाही. त्यातच मेट्रो स्थानकातही याच मार्गाने प्रवेश करावा लागतो. त्यामुळे प्रवासी गोंधळात पडत आहेत. तिकीट काढण्यासाठी आसणारी व्हेंडिंग मशिन बंद पडली आहे. त्यामुळे तिकीट काढणाऱ्यांना रांगेत उभे राहून तिकीट घ्यावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जात आहे. फलाटावर धुम्रपान करणाऱ्यांनी परिसर अस्वच्छ केला आहे. नळाच्या बेसिनमध्ये प्लास्टिक बाटल्यांचा खच पडला आहे. ठिकठिकाणी अस्वच्छता असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
पिंपरी : पिंपरी रेल्वे स्थानकात सायंकाळी गुन्हेगारी प्रार्श्वभूमीच्या व्यक्तींचा वावर असतो. दुपारी आणि रात्री स्थानकात प्रवाशांना त्रास देण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. रात्री लोकलने प्रवास करणाऱ्यांना तिकीट घर किंवा पोलिस चौकीच्या जवळपास थांबावे लागते.
अंतरावर थांबल्यास काही तरुणांकडून विनाकारण विचारपूस करुन त्रास दिला जातो. जवळ भाजीपाला मार्केट असल्यामुळे स्टेशन परिसरात सडका भाजीपाला, फळे टाकली जातात. ती लवकर उचलली जात नसल्यामुळे दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो.
चिंचवड : येथे गेल्या कित्येक दिवसांपासून विकास कामे सुरू आहेत. रेल्वे स्थानकाचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र हाती घेतलेली कामे पूर्ण करण्यास विलंब लागत आहे. दर्शनी भागात बकालपणा वाढला आहे. वाहनतळाची सुविधा नाही, खासगी रहिवाशांकडून पार्किंग शुल्काच्या नावाखाली मनमानी रक्कम आकारली जाते.
फलाट क्रमांक एकवर जाण्यासाठी स्वयंचलित जिना (एस्कलेटर) बसविला, मात्र, तो अद्यापही कार्यान्वित करण्यात आलेला नाही. फलाटावर नळाला पाणी आहे, पण बेसिनची स्वच्छता वेळेवर केली जात नाही. दोन्ही बाजूंनी असलेल्या लिफ्टचे काम कित्येक वर्षांपासून मार्गी लागलेले नाही. बांधकाम अचानक सुरू केल्यामुळे काही ठिकाणी राडारोडा पडला आहे. स्वच्छतागृहात घाणीचे साम्राज्य आहे. धुम्रपान करून त्याची थोटके कोठेही फेकण्यात आली आहेत. तर, गुटखा-पान सेवन करणाऱ्यांनी भिंती रंगवल्याची किळसवाणी स्थिती आहे.
आकुर्डी : रेल्वे स्थानकाजवळच महाविद्यालये असल्यामुळे या परिसरात विद्यार्थ्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. रात्री-अपरात्री स्थानक परिसरात मोठ्या संख्येने आलेली मुले गोंधळ घालतात. येथून प्रवास करणाऱ्यांना भेदरल्यासारखे होते. ही टवाळखोर मुले पोलिसांनाही जुमानत नाहीत. त्यामुळे प्रवाशांसह परिसरातील व्यावसायिकांची डोकेदुखी वाढली आहे. रेल्वे पटरीवर सहज प्रवेश करता येत असल्यामुळे हा परिसर रात्री मद्यपींचा अड्डा बनला आहे. अनेक जोडपी येथे बसतात. अंधाराचा फायदा घेऊन काही विपरीत घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कासारवाडी रेल्वे स्थानकातील व्हेंडिंग मशीन बंद पडली आहे. तिकीट काढण्यासाठी आम्हाला रांगेत उभे रहावे लागते. वेळेत तिकीट न मिळाल्यामुळे अनेकदा लोकल निघून गेली आहे. दुसऱ्या गाडीसाठी पुन्हा प्रतीक्षा करत बसावे लागते. रात्री परत येताना गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांचा सामना करावा लागतो.
- चंद्रकांत माने, प्रवासी
दापोडी स्थानकात बसण्यासाठी बाकडे आहेत. पण, गुटखा खाणारे लोक त्यावर बसून जवळच थुंकतात. त्याचा वास येत असल्यामुळे बाकड्यांवर बसावेसे वाटत नाही. स्वच्छतागृहांत घाण असल्यामुळे त्याचा वापर करावासा वाटत नाही. वाहनतळ चालक परिसरात एक-दोन मिनिटांसाठीही वाहन थांबवू देत नाहीत. प्रत्येकवेळी पैसे द्यावे लागतात.
- आकाश जमदाडे, प्रवासी