

मुंबई (Mumbai): मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी मुंबई महापालिकेच्या खरेदी प्रणालीत आमूलाग्र बदल करण्याची मागणी केली आहे. शालेय वस्तूंची खरेदी आणि जेंडर बजेट अंतर्गत होणाऱ्या वस्तूंच्या वितरणासाठी केंद्र सरकारच्या जेम (Government e-Marketplace) पोर्टलचा तातडीने अवलंब करण्याची मागणी साटम यांनी केली आहे.
मुंबई महापौर तावडे आणि आयुक्त भूषण गगरानी यांना लिहिलेल्या पत्रात, अनेक वर्षांपासून महापालिका शालेय विद्यार्थ्यांना गणवेशापासून स्टेशनरीपर्यंत २७ विविध वस्तू मोफत वाटत आहे. सध्या या वस्तू कंत्राटदारांमार्फत खरेदी केल्या जातात. अनेकदा हे कंत्राटदार उत्पादकांकडून वस्तू घेऊन महापालिकेला वाढीव किंमतीत विकत असल्याचे निदर्शनास आल्याचे साटम यांनी म्हटले आहे.
या २७ वस्तूंची थेट खरेदी केंद्र सरकारच्या जेम पोर्टलवरून करण्याची मागणी त्यांनी केली. महापालिकेने शालेय वस्तू वाटण्याऐवजी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) चाही विचार करावा. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करावी, असे साटम यांनी म्हटले आहे.
यापुढे शालेय वस्तूंसह जेंडर बजेट अंतर्गत महिलांना वितरित होणाऱ्या सर्व सामग्रीची खरेदीही जेम पोर्टलवरूनच केली जावी. यामुळे महानगरपालिकेच्या निधीची मोठ्या प्रमाणावर बचत होईल, खरेदीमध्ये पारदर्शकता येईल आणि भ्रष्टाचार रोखण्यास मदत होईल. अशा पद्धतीने खरेदी केल्यास वाढीव किंमतीमध्ये महापालिकेस वस्तू देता येणार नाहीत, असे आमदार साटम यांनी सांगितले.