
नागपूर (Nagpur) : सरकारी काम अन वर्षानुवर्षे थांब, अशी अवस्था नागपुरात तयार होणाऱ्या जिल्हा रुग्णालयाची झाली आहे. २०१३ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने नागपुरात ‘जिल्हा रुग्णालय’ उभारण्याची घोषणा केली. मात्र सत्ताबदल झाला, २०१५ मध्ये बांधकामाला भाजप सरकारने परवानगी दिली. २८.४४ कोटीतून दोन वर्षांत बांधकाम होईल, असे सांगितले. प्रत्यक्षात सात वर्षे लोटूनही रुग्णालय पूर्णत्वास गेले नाही. २८ कोटींवरचा खर्च मात्र ४४ कोटींवर पोहोचला आहे.
नागपूर जिल्ह्यात २०१९ मध्ये होणारे बांधकाम अद्याप रखडले आहे. ७ वर्षांपासून हे काम सुरू असल्यामुळे या बांधकामाचे ऑडिट करण्याची गरज व्यक्त होत आहे. २०१९-२० मध्ये १० कोटी रुपयांची मागणी केली असता, केवळ १.८४ कोटी रुपये मिळाले. २०२१-२२ मध्ये ५ कोटी रुपये मागितल्यावर केवळ ३ कोटी रुपये मिळाले. कोरोनामुळे दोन वर्षे निधीच मिळाला नाही. गेल्या डिसेंबरमध्ये २ कोटी रुपये मिळाले आहेत. आतापर्यंत २२.९७ कोटी रुपये खर्च झाले आहेत. अशाप्रकारे १०० खाटांचे जिल्हा रुग्णालय ७ वर्षातही पूर्ण झालेले नाही.
२०२४ उजाडणार
सात वर्षात रुग्णालयाच्या बांधकामाचा खर्च १५.५२ कोटींनी वाढला आहे. २८.४८ रुपये इतका अंदाजित बांधकाम खर्च आता ४४ कोटींवर गेला आहे. ३५ हजार ९९९ चौरस मीटर जागेपैकी ६ हजार ४०८ चौरस मीटर जागेवर ही इमारत बांधण्यात येत आहे. ८९५ चौरस मीटर जागेवर वेअर हाऊस आणि नोकर क्वार्टर आहेत. कामाचा वेग पाहता रुग्णालयाचे काम पूर्ण होण्यास २०२४ उजाडणार असे चित्र आहे.
आतापर्यंतचा क्रम
- नागपुरात जिल्हा रुग्णालयाची घोषणा -२०१३
- प्रशासकीय मंजुरी मिळाली - २०१५
- जिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन -२०१६
- प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात - २०१८