खोदलेल्या रस्त्यांमुळे चालणेही कठीण; ठेकेदार अन् महापालिका...
नागपूर (Nagpur) ः शहरात जलवाहिनी, केबल टाकण्यासाठी खोदलेले तसेच पावसाळ्यात नैसर्गिकरित्या पडलेले खड्डे अजूनही कायम आहेत. याशिवाय अनेक रस्त्यांवर चेंबर उंच झाले आहेत. त्यामुळे रस्त्यांवरून पायी चालणे, फिरणेही कठीण झाले आहे. मात्र अतिशय निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करायला नागपूर महानगर पालिका तयार नाही.
शहरातील जनता चौकात सेंट्रल बाजार रोडवर मागील महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक मोठा खड्डा पडला. रहदारीच्या या रस्त्यांवर गेल्या महिन्याभरापासून या खड्ड्याचे काम सुरू आहे. त्यामुळे येथून वाहने वळविताना वाहनधारकांवर अपघाताची टांगती तलवार आहे. एखादवेळी पंचशील चौकाकडून सेंट्रल बाजार रोडकडे वळणारे वाहन व वर्धा मार्गावरून याच मार्गावर वळण घेणाऱ्या वाहनांची धडक होण्याची शक्यता बळावली आहे. शांतीनगरातील मुख्य रस्त्यांवरील बजरंग चौकात काही महिन्यांपूर्वी जलवाहिनी टाकण्यासाठी संपूर्ण रस्त्याचे खोदकाम करण्यात आले होते.
जलवाहिनीवर वॉल्व लावताना चेंबर रस्त्याच्या समतल न लावता ते उंच करण्यात आले. त्यामुळे या रस्त्यावर उंच चेंबरला कधीही वाहने धडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यात एखाद्याचा जीवही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढेच नव्हे खोदकाम केल्यानतंर रस्ताही समतल करण्यात हात आखडता घेण्यात आला. त्यातच याच रस्त्याच्या मध्यभाग वीज खांब उभा आहे. उंच चेंबर, खड्डे व वीज खांब अशी स्थिती असून येथून जाताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. सध्या नागपूर महापालिकेत प्रशासक आहे. त्यांच्यावर कुठलाही राजकीय दबाव नाही. असे असताना निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदेरांना जाब विचारला जात नाही, त्यांच्या विरुद्ध कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.