नाशिकमधील ३५४ कोटींच्या घंटागाडी टेंडरचा मार्ग मोकळा

garbage
garbageTendernama

नाशिक (Nashik) : नाशिक शहरातील कचरा संकलनासाठी पुढील पाच वर्षांसाठी दिलेल्या ३५४ कोटींच्या घंटागाडी ठेक्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या घंटागाडी ठेक्याला २३ नोव्हेंबरला आदेश दिले असून त्यानुसार १ डिसेंबरपासून शहरात तब्बल ३९७ घंटागाड्या कचरा संकलन करणार आहेत. मागील वर्षभरापासून तीन आयुक्त व दोन आजी-माजी पालकमंत्र्यांनी या घंटागाडीच्या ठेक्यांची तपासणी केल्यानंतर हे घंटागाडी टेंडर मार्गी लागले आहे. यामुळे नाशिककरांना कचरा संकलनासाठी पुरेशी सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहे.

garbage
सरकारच्या धोरणालाच हरताळ; 'मलई'च्या पोस्टिंगचे फुटले टेंडर

नाशिक महापालिकेच्या आधीच्या घंटागाडी ठेक्याची मुदत मागील वर्षी डिसेंबरला संपल्यानंतर महापालिकेने नवीन टेंडर प्रक्रिया राबवली. नवीन टेंडरप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जुन्या ठेकेदारास मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान नवीन टेंडर प्रक्रियेत पाच वर्षांचा कचरा संकलनाचा ठेका ३५४ कोटींपर्यंत गेला. मागील पाच वर्षांचा ठेका १७६ कोटींचा असताना नवीन ठेका जवळपास दुप्पट रकमेचा झाल्याने ही टेंडरप्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडली. यामुळे टेंडर प्रक्रिया राबवण्याच्या काळातील महापालिका आयुक्त कैलास जाधव, पवार व डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार या तिघांनीही या टेंडरची तपासणी करण्यात पुरेसा वेळ घेतला. या टेंडरची रक्कम मोठ्याप्रमाणावर फुगल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे तक्रार केली. त्यांनीही या टेंडरची तपासणी करून निर्णय घेण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या. दरम्यानच्या काळात राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आलेले नवीन पालकमंत्री दादा भुसे यांनीही या टेंडरबाबत तपासणी करण्याचे आदेश दिले. यामुळे अनेकदा तपासणी होऊन व प्रत्येक तपासणीतून तावून सुलाखून निघालेले हे टेंडर मार्गी लागत नव्हते. मागील महिन्यात तर हे टेंडर रद्द केल्याच्याही चर्चा सुरू झाल्या. दरम्यान अखेर महापालिका प्रशासनाने वर्षभरानंतर हे टेंडर मंजूर करीत त्यात पात्र ठरलेल्या ठेकेदारांना कार्यारंभ आदेश देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार नाशिक पश्‍चिम व सिडको या परिसराचा कचरा उचलण्याचा ठेका वॉटर ग्रेस या कंपनीला मिळाला आहे. पंचवटी व सातपूर विभागाचा ठेका ॲन्थोनी एन्वा या कंपनीला मिळाला आहे. नाशिकरोड विभागाचा ठेका तनिष्क एंटरप्राईजेसला, तर नाशिकपूर्वचा ठेका सय्यद असिफ अली या कंपनीला मिळाला आहे.

garbage
नाशिक झेडपीच्या स्थगिती उठवलेल्या 79 कोटींची कामे रद्द करणार?

अशी असेल नवी घंटागाडी सेवा
-
नाशिक शहरातील जुने नाशिक, पंचवटी व सिडको परिसरातील अरुंद रस्त्यांवरू धावण्यासाठी ३८ लहान घंटागाड्या असणार आहेत.
- यापूर्वी नाशिकमध्ये एकूण घंटागाड्यांची संख्या २७४ होती. त्यात १२३ ची भर पडून आता शहरात ३९७ घंटागाड्या कचरा संकलन करणार आहेत.
- कचऱ्याचे ठिकाण व प्रकारानुसार कचरा संकलनासाठी वाहने निश्‍चित करण्यात आली असून त्यानुसार हॉटेल्समधील कचरा संकलनासाठी २४ वाहने, उद्यानांमधील कचरा संकलनासाठी ३३ वाहने बांधकाम क्षेत्रातील कचरा उचलण्यासाठी सहा वाहने, व्यावसायिक कचरा उलण्यासाठी १० वाहने असणा आहेत. तसेच झोपडपट्टी भागातील कचरा संकलनासाठी ३६ वाहने असणार आहेत.
- यापूर्वी कचरा संकलन सकाळी सातपासून सुरू होते. मात्र, सकाळीच नोकरीवर जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नवीन ठेक्यातील घंटागाड्या सकाळी सहापासून कचरा संकलन सुरू करणार आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com