
नाशिक (Nashik) : नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागाने शालेय पोषण आहारासाठी बचत गटांची निवड केल्यानंतर महापालिका आयुक्तांनी तपासणी केली. त्यानंतर २० बचत गट पात्र ठरवण्यात आले आहेत. या सर्व पात्र बचतगटांनी ऑनलाईन टेंडरमध्ये नमूद केलेल्या सोईसुविधा प्रत्यक्षात जागेवर आहे किंवा नाही, याची शहनिशा अन्न व औषध प्रशासनातर्फे उद्या (दि.१४) पासून केली जाणार आहे. यामुळे आधीच ३७ बचत गटांची निवड करायची असताना प्रत्यक्षात २० बचत गट पात्र ठरले आहे. यामुळे नव्याने टेंडर मागवण्यात येणार असून तत्पूर्वी अन्न व औषध प्रशासनाच्या पाहणी अहवालानंतर पुन्ह काही गटांवर गडांतर येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
नाशिक महापालिकेच्या शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्याचे काम बचतगटांना देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बचत गटांकडून ऑनलाईन टेंडर मागवण्यात आली. महापालिकेने यासाठी विद्यार्थी संख्येनुसार बचत गटांचे तीन गटात वर्गिकरण केले होते. त्यात दहा हजार विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरवण्यासाठी दोन, दोन हजार विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरवू शकणरी पंचवीस व चार हजार विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरवू शकणाऱ्या १० बचत गटांची निवड करण्याचे निश्चित करण्यात आले. यासाठी ५५ बचत गटांनी ऑनलाईन पद्धतीने टेंडरही भरले. त्यानंतर 16 जून 2022 रोजी बचत गट निश्चित करण्यात आले. दरम्यान या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले गेले. तेथेही बचत गटांच्या बाजूने निकाल आला. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी या सर्व निवड झालेल्या बचत गटांच्या कागदपत्रांची तपासणी केली व पुन्हा ते शिक्षण विभागाकडे पाठवले. त्यानुसार शिक्षण विभागाने २० बचत गट पात्र ठरवले आहे.
शिक्षण विभागाच्या या पात्र गटांच्या यादीनुसार दहा हजार विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरवण्यासाठी एकही बचतगट पात्र ठरलेला नाही. तसेच चार हजार विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरवण्यासाठी दहा गटांची निवड करायची असताना त्यासाठी नऊ गट पात्र ठरले आहेत व दोन हजार विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरवण्यासाठी २५ गटांची निवड करायची असताना प्रत्यक्षात ११ गट पात्र करण्यात आले आहेत. यामुळे ३७ गटांची निवड करायची असताना प्रत्यक्षात २० गट पात्र ठरले असून आता उर्वरित १७ गटांच्या निवडीसाठी पुन्हा टेंडर मागवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी इगतपुरी तालुक्यातील एका शाळेत पोषण आहारातून झालेल्या विषबाधेतून दोन विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला होता. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून अन्न व औषध प्रशासन विभाग जागा झाला आहे. यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने महापालिका शिक्षण विभागाशी संपर्क साधून त्यांनी या पात्र ठरलेल्या बचत गटांची यादी मागवली आहे. या यादीतील बचत गटांच्या किचन शेड व तेथे उभारण्यात आलेल्या सुविधांची पाहणी करून ते महापालिका प्रशासनास अहवाल देतील. त्यानंतर या बचत गटांना कार्यारंभ आदेश दिले जातील, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.