ठेकेदाराने काम बंद केले तर; भीतीने जलसंधारण विभागातील अधिकारीच...

Nashik
NashikTendernama

नाशिक (Nashik) : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागासाठी वरदान ठरणाऱ्या कुंदेवाडी-खोपडी-मिरगाव व कुंदेवाडी- सायाळे या बंदिस्त पाईपलाईन योजनेने काम रेंगाळल्यामुळे सध्या देवनदीतून पाणी वाहून जात असतानाही लाभार्थ्यांपर्यंत त्याचा लाभ पोहोचत नसल्याची स्थिती आहे. कुंदेवाडी-सायाळे या योजनेचे १७ किमी काम झाले आहे. मात्र, केवळ गोंदनाल्यावरील दोनशे मीटर पाइप न जोडल्यामुळे सरकारचे ५० कोटी रुपये खर्च होऊनही त्यापुढील लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा होत नसल्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत. दरम्यान ठेकेदाराने काही काम केले असून त्याच्यावर कारवाई केल्यास तो काम बंद करील, या भीतीने जलसंधारण विभागातील अधिकारी त्याच्यावर कारवाई करण्यास कचरत असल्याचे बोलले जात आहे.

Nashik
कंत्राटदारावर का भडकले शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर; थेट कानशिलात

सिन्नर तालुका हा कायम अवर्षणग्रस्त तालुका असून, त्याच्या पूर्व भागात वर्षाला २०० मिमी पेक्षा अधिक पाऊस होत नाही. यामुळे या भागातील नागरिकांचे मोठ्याप्रमाणावर स्थलांतर झालेले आहे. दरम्यान सिन्नरच्या पश्‍चिम भागात उगम पावलेल्या देवनदीवर धरण नसल्यामुळे त्यातील पाणी दरवर्षी गोदावरी नदीत वाहून जात आहे. यामुळे देवनदीचे पूरपाण्याने पूर्वभागातील नदी नाल्यांना सोडून तेथील पाझरतलाव, केटीवेअर, लघुपाटबंधारे प्रकल्प भरायचे, या संकल्पनेने कुंदेवाडी-खोपडी-मिरगाव व कुंदेवाडी-सायाळे या दोन बंदिस्त पाईपलाईन योजना प्रस्तावित करून त्यांना २०१९ मध्ये कार्यारंभ आदेश दिले आहेत. या दोन्ही योजना एकाच ठेकेदाराला दिल्या असून या योजना २०२२ पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक होते. योजनेचा कालावधी पूर्ण होऊनही आतापर्यंत कुंदेवाडी-सायाळे या योजनेचे ३५ किमीपैकी केवळ १७ किमीचे काम पूर्ण झाले आहे, तर कुंदेवाडी-मिरगाव योजनेचे ३२ पैकी पाच-सहा किमी काम पूर्ण झाले आहे. या दोन्ही योजनांमुळे पूर्व भागातील नदी-नाल्यांवरील किमान १०० बंधाऱ्यांमध्ये पाणी भरण्याचे नियोजन आहे. त्यासाठी कुंदेवाडी -सायाळे या योजनेचे टेंडर १०० कोटी रुपये, तर कुंदेवाडी-मिरगाव योजनेचे टेंडर ९० कोटी रुपयांना देण्यात आले आहे.

Nashik
मुंबई मेट्रो कारशेडच्या कांजूरमार्ग जागेबद्दलची 'ती' याचिका मागे

संबंधित ठेकेदाराने शेतांमध्ये पीक असल्याचे कारण देत तीन वर्षे वेळकाढूपणा केल्याचे दिसत आहे. त्याचवेळी योजनेचे काम लांबत असल्यामुळे बांधकाम सहित्य, इंधन दर वाढल्यामुळे वाढीव दराने बिले दिली, तरच काम केले जाईल, असा इशारा देत असल्यामुळे जलसंधारण विभागाकडून त्यांना वाढीव दराने बिले दिली जात आहेत. ठेकेदार त्याच्या कारखान्यातून पाईप तयार होतील, त्या प्रमाणात बंदिस्त पाईपलाईनचे काम करीत आहे. ठेकेदारारने आतापर्यंत कुंदेवाडी-सायाळे या १७ किमी कामाचे ५० कोटींची बिले काढून घेतली आहे. यामुळे या पाईपलाईनमधून किमाान १७ किमीपर्यंत पाणी वाहून जाणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात केवळ मुसळगाव-दातली या सहा किमीपर्यंत पाणी गेले आहे. या पाईपलाईनच्या सहा किमी अंतरावरील गोंदनाला येथे २०० मिटर भागात पाईप जोडले नाही. तसेच पाणी विमोचक व जलसेतु तयार केले नाहीत, यामुळे तेथून पुढे पाईपलाईन तयार असूनही त्यापुढील खंबाळे, भोकणी, दोडी बुद्रूक, मऱ्हळ, सुरेगाव, पांगरी आदी गावांमधील बंधाऱ्यांपर्यंत पाणी पोहोचू शकले नाही. यामुळे एकीकडे देवनदी दुथडी भरून वाहत असताना व तेथून पाईपलाईन केलेली असतानाही पूर्वभागातील बंधारे पावसाळ्यातही कोरडे आहेत. संंबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी यासाठी ठेकेदाराकडे पाठपुरावा करूनही प्रतिसाद दिला जात नाही. वेळेत काम पूर्ण न केल्यामुळे ठेकेदारावर कारवाई करावी, तर ठेकेदार न्यायालयात जाईल व थोडक्यासाठी संपूर्ण योजना ठप्प पडून शेतकऱ्यांचे नुकसान होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Nashik
सीएम सोडविणार का पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे भूसंपादनाचा तिढा?

मागील काही वर्षांच्या पर्जन्यमानाच्या अभ्यासावरून देवनदी दर तीन वर्षांनी सलग दीड-दोन महिने प्रवाहित असते. यामुळे यावर्षी या बंदिस्त पाईपलाईनचे पाणी दुष्काळी भागात पोहोचले नाही, तर त्या पाईपलाईचा फायदा मिळण्यासाठी शेतकऱ्यांना २०२५ ची वाट बघावी लागेल. यामुळे तातडीने २०० मीटर पाईपलाईन टाकून या योजनेचा लाभ १७ किमीपर्यंतच्या शेतकऱ्यांना मिळावा, अशी मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com