
मुंबई (Mumbai) : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गातील स्थापत्य कामे पूर्ण होऊन आकार घेणारे सुरत हे पहिले स्थानक ठरले आहे. या स्थानकाचे कॉन्कोर्स आणि रेल्वे लेव्हल स्लॅब देखील पूर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे, हिऱ्याच्या आकाराच्या प्रतिकृतीमध्ये साकारण्यात येत असलेले हे स्थानक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून करण्यात येत आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर २८ कॉन्ट्रॅक्ट पॅकेजेसमध्ये विभागला गेला आहे. ज्यापैकी ११ सिव्हिल पॅकेजेस आहेत, ३३ महिन्यांच्या कालावधीसाठी करार करण्यात आला आहे. गुजरात राज्यातील चार हायस्पीड रेल्वे स्थानक (वापी, बिलीमोरा, सुरत आणि भरूच) आणि सुरत रोलिंग स्टॉक डेपोसह २३७ किमी. वायाडक्टच्या बांधकामासाठी पहिला सिविल करार २८ ऑक्टोबर २०२० रोजी करण्यात आला, जो भारतातील सर्वात मोठा नागरी करार देखील होता. महाराष्ट्र राज्यातील तीन हायस्पीड रेल्वे स्थानकांसह (ठाणे, विरार आणि बोईसर) १३५ किमी लांब. वायडक्टसाठी अंतिम सिविल करार १९ जुलै २०२३ रोजी करण्यात आला.
गुजरात राज्यातील वापी, बिलीमोरा, सुरत आणि भरूच या चार स्थानकांपैकी सुरत स्थानकांची स्थापत्य उभारणी आता प्रगतीपथावर आहे. स्थापत्य काम पूर्ण होऊन आकार घेणारे सुरत हे या मार्गातील पहिले स्थानक ठरले आहे. या स्थानकाचे कॉन्कोर्स आणि रेल्वे लेव्हल स्लॅब पूर्ण झाले आहेत. स्टेशनचा ४५० मीटर लांब कॉन्कोर्स आणि ४५० मीटर लांबीचा रेल्वे लेव्हल पूर्ण झाला आहे. या स्थानकासाठीचा पहिला स्लॅब २२ ऑगस्ट २०२२ रोजी टाकण्यात आला आणि शेवटचा स्लॅब २१ ऑगस्ट २०२३ रोजी टाकण्यात आला. म्हणजेच, एका वर्षाच्या कालावधीत दोन्ही कॉनकोर्स आणि रेल्वे स्तरावरील स्लॅब पूर्ण झाले. या स्थानकाचे अंतरंग हिऱ्याच्या आकाराची प्रतिकृती रुपात साकारले जाणार आहे.
असे असेल बुलेट ट्रेनचे स्थानक
प्लॅटफॉर्म लेव्हल
- ४ फ्लॅटफॉर्म
कोनकोर्स लेव्हल
-प्रतीक्षा कक्ष आणि व्यापार कक्ष
- स्वच्छतागृहे
-नर्सरी
-दुकाने आणि कियोस्क
-तिकीट काऊंटर आणि नागरी सुविधा कक्ष
तळमजला
-वाहनतळ
-पिकअप आणि ड्रॉप (कार, बस, ऑटो)
-पादचारी मार्ग
-सुरक्षा आणि तपासणी कक्ष
-लिफ्ट, एस्किलेटर आणि ट्रॅव्हलेटर