रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी आता नवा मंत्री अन् नवी डेडलाईन

Mumbai-Goa Highway
Mumbai-Goa HighwayTendernama

मुंबई (Mumbai) : गेली १२ वर्षे रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग (Mumbai-Goa Highway) डिसेंबर २०२३ अखेर पूर्णत्वास जाईल अशी माहिती राज्याचे नवनियुक्त सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच विधीमंडळात दिली. तसेच या महामार्गावरील खड्डे २५ ऑगस्टपर्यंत भरण्यात येतील, असे आश्वासन सुद्धा मंत्री चव्हाण यांनी दिले.

Mumbai-Goa Highway
मुंबई : रस्त्यांच्या ५८०० कोटींच्या टेंडरसाठी २५ कंपन्यांत स्पर्धा

काम सुरू झाल्यापासून अनेक वर्षांपासून हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. महामार्गाच्या अकरा टप्प्यांचे काम करणार्‍या 11 पैकी मोजके कंत्राटदार वगळता अन्य कंत्राटदारांनी 60 टक्क्यांपर्यंतही काम केलेले नाही. मुंबई गोवा- महामार्ग अनेक वर्षापासून मृत्यूचा सापळा बनला असून निकृष्ट दर्जाचे काम झाले असल्याने आतापर्यंत सुमारे अडीच हजार लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. मुंबई- गोवा महामार्गाचे काम दहा टप्प्यात विभागून देण्यात आले असून त्यापैकी नऊ टप्प्यांच्या कामांची जबाबदारी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. पनवेल ते इंदापूर दरम्यान निकृष्ट दर्जाची कामे झाल्याने रस्त्यावर खड्डे पडून अपघात झाले आहेत.

Mumbai-Goa Highway
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वरील अपघात रोखणार 'हे' नवे तंत्रज्ञान

मुंबई-गोवा या रखडलेल्या महामार्गाबाबत शिवसेनेचे सुनील प्रभू यांच्यासह शेखर निकम, जितेंद्र आव्हाड, विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, भास्कर जाधव, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील यांच्यासह अनेक आमदारांनी लक्षवेधी मांडली होती. महामार्गाचे काम रखडल्याची कबुली मंत्री चव्हाण यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच यासंदर्भात बैठक पार पडली असून, या बैठकीत संबंधित विभागाला योग्य त्या सूचना करण्यात आल्या आहेत. २६ ऑगस्टनंतर महामार्गाचा दौरा करू, असे मंत्री चव्हाण यांनी यावेळी जाहीर केले. कशेडी आणि परशुराम घाटाच्या मातीचे सर्वेक्षण करण्यासाठी टेरी या संस्थेकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. लवकरच या संस्थेकडून अहवाल प्राप्त होणार असून, या संस्थेचा अहवाल आल्यानंतर त्यासंदर्भात उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती मंत्री चव्हाण यांनी यावेळी दिली.

Mumbai-Goa Highway
नाशिक मनपाचे आणखी एक टेंडर वादात; विशिष्ट कंपनीवर मेहरबानीचा आरोप

भूसंपादनासाठी लागलेला कालावधी आणि इतर अनेक कारणांमुळे येथील काम संथगतीने सुरू आहे. मात्र, काम तातडीने करावे यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. डिसेंबर २०२३ पर्यंत काम पूर्ण करण्यात येईल. परशुराम घाटाचे रखडलेले काम मे २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भक्तांना अडचणी येऊ नयेत म्हणून खड्डे युद्धपातळीवर बुजविण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाने महामार्गावरील 471 किमी लांबीच्या चौपदरीकरणाला 2011 साली प्रत्यक्ष सुरूवात केली. प्रामुख्याने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांत एकूण 11 टप्प्यात महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले. या महामार्गावर पनवेल ते झारप-पत्रादेवी मार्गाचे चौपदरीकरण केले जात आहे. पनवेल ते इंदापूर (शून्य ते ८४ कि.मी.) हा टप्पा केंद्र सरकारच्या एनएचएआयच्या अखत्यारीत; तर इंदापूर ते पत्रादेवी (महाराष्ट्र-गोवा सीमा) (चिपळूण, हातखंबामार्गे) (८४ किमी ते ४७१ किमी) या टप्प्याची (१० भागांत विभागणी) जबाबदारी राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकामकडे आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com