समृद्धी महामार्गामुळे आता 'हे' संकट; शेतकऱ्यांना बसतोय मोठा फटका

Samruddhi Mahamarg
Samruddhi MahamargTendernama

नाशिक (Nashik) : मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गासाठी 50 हजार कोटींपेक्षा अधिक खर्च करण्यात येत आहे. या महामार्गाचे 80 टक्के काम झाले आहे. हा महामार्ग बघितल्यानंतर प्रत्येकजण अचंबित होतो. मात्र, महामार्ग काम पूर्ण झाल्यानंतर पहिल्याच पावसाळ्यात त्यातील एक त्रुटी उघडकीस आली आहे. या महामार्गावर पडणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी केलेले चर थेट शेजारच्या शेतांमध्ये सोडण्यात आले आहे. यामुळे आधीच पावसामुळे पिके संकटात असताना या महामार्गावरून वाहून येणाऱ्या पाण्यामुळे त्यात भर पडत आहे.

Samruddhi Mahamarg
ठेकेदाराने काम बंद केले तर; भीतीने जलसंधारण विभागातील अधिकारीच...

मुंबई - नागपूर हा समृद्धी महामार्ग 710 किमी असून त्याचे शिर्डीपर्यंतचे काम जवळपास पूर्ण होत आले असून, शिर्डी ते इगतपुरी या टप्याचे कामही अंतिम टप्यात आहे. हा महामार्ग जमिनीपासून उंच असून पूर्णपणे काँक्रिटीकरण असलेल्या या रस्त्यावर पडणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याच्या उताराला चर करण्यात आले आहेत. या चरातून खाली जाणारे पाणी एकत्र करून त्याची साठवणूक करण्याची कोणतीही स्वतंत्र सोय केलेली नाही. यामुळे रस्त्यावरून खाली वाहून येणारे पाणी थेट शेजारच्या शेतात जाते. हा महामार्ग 80 मीटर रुंदीचा असून एवढ्या मोठ्या रस्त्यावरून येणारे पाणी महार्गाच्या दुतर्फा शेतांमध्ये जात आहे. यावर्षी सिन्नर तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक असून त्यामुळे खरीप पिके जास्त पावसामुळे पिवळी पडू लागली आहेत. त्यातच समृद्धी महामार्गालगतच्या शेतांमध्ये घुसत असल्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे.

Samruddhi Mahamarg
महाराष्ट्रातील नॅशनल हायवे का बनलेत मृत्यूचे सापळे?

महामार्ग आराखडा तयार करताना पावसाचे पाणी रस्त्यावरून बाहेर कसे काढायचे याचा विचार केला, पण ते पाणी शेजारच्या शेतात जाऊन त्याचे नुकसान होऊ शकते याचा विचार तज्ज्ञांच्या डोक्यात घुसला नाही, याचा फटका सामान्य शेतकऱ्यांना बसतो आहे. याबाबत सिन्नरच्या शेतकऱ्यांनी संबंधित बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या लक्षात ही बाब आणून दिली, त्यांनी दुर्लक्ष केल्याने अखेर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडे तक्रार केली. त्यांच्या कार्यकारी अभियंत्यांनी ही त्रुटी असल्याचे मान्य करीत उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदार कंपनीला दिल्या आहेत. मात्र, केवळ सूचना देऊन भागणार नाही तर पावसाचे पाणी चराद्वारे खाली आल्यानंतर ते शेतात न सोडता त्याची साठवणूक करण्याची स्वतंत्र सोय करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com