पिंपरी महापालिकेच्या प्रशासकांचा 'या' कामावरून ठेकेदारांना इशारा

PCMC
PCMCTendernama

पिंपरी (Pimpri) : ‘‘शहरास वॉटर प्लस प्रमाणीकरण प्राप्त व्हावे, यासाठी महापालिका नियोजन करून अंमलबजावणी करीत आहे. महापालिकेच्या कार्यक्षेत्रात सेफ्टिक टँक स्वच्छतेचे काम करणाऱ्या सर्व ठेकेदारांनी त्यांच्या कामाच्या स्वरूपाची नोंदणी महापालिकेकडे करणे बंधनकारक असून, अनौपचारिक, असुरक्षित काम करताना आढळल्यास तसेच मैला उघड्यावर उत्सर्जित करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल,’’ अशा सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी शहरातील सेफ्टिक टँक साफसफाई करणाऱ्या ठेकेदारांना दिल्या आहेत.

PCMC
'कॅग'ला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेची नोटीस; कोविड काळातील खर्च...

शहराला देशातील सर्वात स्वच्छ, सुंदर व राहण्यास सुलभ तसेच सर्व सोयीसुविधायुक्त शहर म्हणून नावलौकिक मिळविण्यासाठी महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२३ स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने शहरात स्वच्छतेबाबत विविध उपक्रम राबविण्यात येत असून शहरातील सेफ्टिक टँक साफसफाई करणाऱ्या सर्व ठेकेदारांनी काम सुरू करण्यापूर्वी त्यांच्या कामकाजाच्या स्वरूपाविषयी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी करणे गरजेचे आहे. महापालिकेच्या हद्दीत अनौपचारिकरीत्या काम करताना असुरक्षितरित्या काम करताना किंवा मैला उघड्यावर उत्सर्जित करताना आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. सेफ्टिक टँक आणि भुयारी गटारांच्या तक्रार निवारणासाठी महापालिकेने २४ बाय ७ कार्यान्वित असलेला १४४२० हा हेल्पलाइन नंबर उपलब्ध करून दिला आहे.

PCMC
मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात 'MMRDA'ची 2700 कोटींची टेंडर

महापालिकेचे आवाहन
- सफाई मित्रांनी साफसफाई करताना सुरक्षा किटचा वापर करावा
- सुरक्षेला प्रथम प्राधान्य द्यावे
- आरोग्याची काळजी घ्यावी
- नागरिकांनी सुरक्षित साफसफाईसाठी महापालिकेकडे नोंदणीकृत असलेले सफाई मित्रच नेमावेत

कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
महापालिकेच्या वतीने स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी व स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर क्षमता बांधणी कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. याद्वारे कर्मचाऱ्यांना स्वच्छता कार्यात वापरावयाच्या सुरक्षा साधनांचा वापर कसा करावा, मानसिक व शारीरिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी यासोबतच विविध कचऱ्याचे वर्गीकरण कसे करावे याबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com