पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आता इंटरमिजिएट रिंगरोड

Pune
PuneTendernama

पुणे (Pune) : वर्तुळाकृती उच्च द्रुतगती उन्नत महामार्ग (एचसीएमटीआर) अद्याप कागदावर असताना आता महापालिकेने इंटरमिजिएट रिंगरोडची आखणी केली आहे. ७० किलोमीटरच्या या रिंगरोडमुळे पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतूक न जाता शहराच्या बाहेरच्या बाहेरच वाहतूक वळविण्याचे नियोजन महापालिकेकडून सुरू आहे. यापैकी सध्या ४७ किलोमीटरचा रस्ता शहराच्या चारही बाजूला अस्तित्वात आहे. हे रस्ते एकमेकांना जोडून हा रिंगरोड केला जाणार आहे, त्यासाठी २३ किलोमीटरचा रस्ता केला जाईल. यात बोगदे, नदीवरील पूल, रेल्वेवरील पूल प्रस्तावित आहेत. या प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्त करण्याची महापालिकेने प्रक्रिया सुरू केली असून, सुमारे ३ हजार कोटींचा हा प्रकल्प असणार आहे.

Pune
लष्कराच्या निर्णयाने पुणे-मुंबई मार्गाचा श्वास मोकळा!अडीच किमीसाठी

शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेट्रो, उड्डाणपूल असे प्रकल्प केले जात असले तरी सर्व प्रकारची वाहतूक शहराच्या मध्यवर्ती भागात येत आहे. त्यामुळे स्वारगेट, शिवाजीनगर, हडपसर गाडीतळ, खराडी, येरवडा, पुणे विद्यापीठ, नवले पूल, नळ स्टॉप, कात्रज चौक, पुणे विद्यापीठ चौक, चांदणी चौक या भागात येत असल्याने तेथे वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी टाळण्यासाठी नगर रस्ता सोलापूर रस्त्याला, सोलापूर रस्ता सातारा रस्त्याला तसेच सातारा रस्ता सिंहगड रस्त्याला जोडला जाणार आहे. सिंहगड रस्ता कर्वे रस्त्याला तर कर्वे रस्ता हा बाणेर, पाषाण रस्‍त्याला जोडला जाईल. यासाठी या रस्त्यांना जोडणारे इतर रस्ते तातडीने पूर्ण केल्यास शहरात आपोआप रिंगरोड तयार होतो. २०१७ च्या विकास आराखड्यात हे रस्ते दाखविण्यात आले आहेत.

१९८७ पासून विकास आराखड्यात दर्शविलेला ‘एचसीएमटीआर’ हा रस्ता केवळ सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरला जाणार आहे. त्यावर निओ मेट्रो करण्यासाठी डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे हा इंटरमिजिएट रिंगरोड खासगी वाहनांसाठी उपयुक्त ठरेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Pune
पुणे महापालिकेवर नामुष्की; शुद्ध पाण्यासाठी नदीखालून पाइपलाइन...

इंटरमिजिएट रिंगरोडची पाच भागात विभागणी
१ कोथरूड, पाषाण, बाणेर रस्ता त्यात दोन बोगदे प्रस्तावित
२ पौड, कर्वे, सिंहगड आणि सातारा रस्त्याचा भाग दोन मध्ये समावेश, यात तळजाई बोगदा
३ सातारा, सोलापूर रस्त्यांना जोडणाऱ्या अपूर्ण रस्त्यांचे काम तिसऱ्या भागात
४ चौथ्या भागात सोलापूर व नगर रस्त्याचा परिसर आहे. त्यामध्ये केशवनगर खराडीला जोडणारा नदीवरील पूल, रेल्वे पूल, फुरसुंगी-मांजरी-खराडी रस्त्याचा समावेश
५ नगर रस्त्याला जुना मुंबई पुणे महामार्ग जोडणे, विश्रांतवाडी ते होळकर पूल, संगमवाडी पूल, खडकी येथे जोडणे, खराडी, वाघोली परिसराचा पाचव्या भागात समावेश

या ठिकाणी जोडले जाणार रस्ते
रस्त्याचे नाव - रुंदी (मीटरमध्ये) - लांबी (मीटरमध्ये)
१- बाणेर सुस लिंक रस्ता - ३६ - १५०
२- सुतारवाडी रस्ता ते सुस रस्ता - २४ - ६५०
३ - बावधन चौक ते सोमेश्‍वर रस्ता - २४ - १०५०
४ - पाषाण ते सुतारदरा बोगदा - ३० - १६००
५ - पाषाण ते गोखलेनगर बोगदा - २४ - ८७०
६ - वनाज ते सुतारदरा रस्ता - ३०-८०
७ - सुतारदरा ते कोथरूड पोलिस ठाणे- २४- २०००
८ - ठाकरे पथ ते युनिव्हर्सल चौक(टेकडीच्या बाजूने)-२४- १२००
९- युनिव्हर्सल चौक ते नदीकाठचा रस्ता - २४-५००
१०-कर्वेनगर ते सनसिटी मुठा नदीवर पूल -३०-४००
११- अमृता गंगा चौक ते कॅनॉल रस्ता - १८-५००
१२- डीपी रस्ता - २४-६२०
१३- सिंहगड रस्ता ते सातारा रस्ता बोगदा - १८-५००
१४- अप्पर इंदिरानगर ते काकडेनगर रस्ता -२४-१४००
१५ - काकडेनगर ते कोंढवा रस्ता - २४- १०८०
१६ - कोंढवा रस्ता ते एनआयबीएम रस्ता - २४-६६०
१७ - महंमदवाडी टीपीएस रस्ता - २५- ३५००
१८- ॲमनोरा सिटी ते केशवनगर रेल्वे पूल- २४- १२००
१९ - केशवनगर ते खराडी आयटी पार्क - ३०- ५००
२० - नगर रस्ता ते लोहगाव वाघोली रस्ता - २४- २५००
२१ - विमानतळ रस्ता ते धानोरी रस्ता - ३०-१०००

इंटरमिजिएट रिंग रोड लांबी - ७० किलोमीटर
सध्या अस्तित्वात असलेले रस्ते - ४७ किलोमीटर
जोडले जाणारे २१ रस्ते - २३ किलोमीटर
आवश्‍यक रुंदीकरण - ७ किलोमीटर
बोगदे - ३
नदीवरील पूल - २
रेल्वे पूल - १

शहरातील प्रमुख रस्त्यांवरील, चौकांमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे. त्यासाठी इंटरमिजिएट रिंगरोड तयार केला जाणार आहे. सध्याचा रस्ता, भूसंपादन यासाठी नुकतीच एक बैठक झाली. या प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्त करून, पुढील दोन ते तीन वर्षात हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळेल.
- व्ही. जी. कुलकर्णी, प्रमुख, पथ विभाग

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com