
मुंबई (Mumbai) : मुंबईतील सिमेंट कॉंक्रिट रस्त्यांच्या विकासाच्या कामासाठीच्या टेंडर प्रक्रियेला अत्यंत थंड प्रतिसाद मिळाल्याने ही प्रक्रियाच रद्द करण्याची नामुष्की बीएमसीवर आली आहे. कमी कंपन्यांनी प्रतिसाद दिल्यामुळे आता नव्या निकषांसह दोन आठवड्यांत टेंडर काढण्यात येणार आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करतानाच दर्जाशी कुठल्याही प्रकारची तडजोड न करता जलद गतीने ही कामे करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
मुंबई महानगरपालिकेकडून ४०० किमीच्या सिमेंट कॉंक्रिटच्या रस्त्यांसाठी ५ हजार ८०० कोटी रुपयांचे टेंडर काढले होते. या टेंडरला अतिशय कमी प्रतिसाद मिळाला. अवघ्या सहा कंपन्यांनी सहभाग नोंदविल्यामुळे ही संपूर्ण टेंडर प्रक्रियाच रद्द करण्याची वेळ बीएमसीवर आली आहे. आता पुन्हा नव्या निकषांसह पुढील दोन आठवड्यांत या संदर्भातील टेंडर प्रक्रिया सुरू केली जाणार आसल्याचे सांगण्यात आले.
नव्याने टेंडर प्रक्रिया सुरू करतानाच ही कामे अतिशय जलद गतीने व्हावीत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, कामे जलद गतीने करताना गुणवत्तेशी तडजोड केली जाणार नाही, असा प्रशासनाचा दावा आहे. ४०० किमीच्या सिमेंट कॉंक्रिटच्या रस्त्यांसाठी पालिका प्रशासनाने ऑगस्ट महिन्यात टेंडर प्रक्रिया सुरू केली होती. या टेंडरमधील काही अटी व शर्थींमुळे अधिक कंपन्यांनी त्यात सहभाग दाखवला नाही.
काही अटी व शर्थींना कंत्राटदारांनी नापसंती दर्शवली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने रक्कम अदा करण्याचा मुद्दाही समोर आला आहे. काम पूर्ण झाल्यानंतर ८० टक्के रकमेचे अधिदान करण्याची पालिकेची अट होती. तर २० टक्के रक्कम ही दोषदायित्व कालावधीत देण्यात येईल, अशी अट होती. त्यामुळे या २० टक्क्यांच्या निकषाला कंत्राटदारांचा विरोध आहे. त्याच बरोबर गुणवत्ता पडताळणीसाठी पालिकेने कडक अटी व शर्थी ठेवल्या आहेत. त्यामध्ये गुणवत्ता दोष आढळल्यास जबर दंडाची कारवाई केली जाईल, असे पालिकेचे म्हणणे आहे.
काही कडक अटी व शर्थींचे पुर्नविलोकन करण्यात येईल. पण गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली. इतका कमी प्रतिसाद कशामुळे आला याचीही माहिती घेण्यात येत आहे. येत्या दोन महिन्यांत ही टेंडर प्रक्रिया पुन्हा राबविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.