'या' कारणामुळे बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची पुन्हा रखडपट्टी

BDD chawls
BDD chawlsTendernama

मुंबई (Mumbai) : नेहमी या ना त्या कारणाने बी.डी.डी. चाळींचा पुर्नविकास रखडत आला आहे. आता राज्यातील सत्तांतराची यात नव्याने भर पडली आहे. सत्ताबदलामुळे ना. म. जोशी मार्गावरील बी.डी.डी. चाळींचा पुनर्विकास अनिश्चित काळासाठी रखडण्याची चिन्हे आहेत. याठिकाणी एकूण ३२ चाळी आहेत. पहिल्या टप्प्यात १० चाळींचे काम सुरु करण्यात आले. त्यापैकी आतापर्यंत फक्त एक चाळ पाडण्यात आली आहे. म्हाडाला हा प्रकल्प ५ वर्षात पूर्ण करायचा होता पण पुर्नविकासाची ही कासवगती पाहता त्यावर भलेमोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ना. म. जोशी मार्गावरील स्थलांतरणाची प्रक्रिया धिम्या गतीने सुरू आहे. सध्या अकरा क्रमांकाची चाळ पाडण्यात आली आहे. बारा नंबरच्या चाळीमध्ये आठ पोलिसांची कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यांचा प्रश्न सुटलेला नाही. तीस नंबर चाळ रिकामी केली आहे, पण या चाळीमध्येदेखील दोन ते तीन भाडेकरू आहेत. शिवाय चार चाळी अशा आहेत की तेथील रहिवाशांची पात्रता झाली आहे. त्यांना तीन वर्षे झाले संक्रमण शिबिर मिळाले आहे. मात्र, या चाळीदेखील रिकाम्या करण्यात आलेल्या नाहीत. कामाची गती अशीच राहिली तर पुनर्विकासाला किती वर्षे लागतील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तीन चाळी पाडायला कित्येक दिवस लागत आहेत, तर चार चाळींचे काम कधी होणार. पाच वर्षांत प्रकल्प कसा पूर्ण होणार? असे सवाल उपस्थित होत आहेत.

शिवसेना-भाजप सरकार असताना हा प्रकल्प आला. हे काम सुरू असतानाच आघाडी सरकार आले. तेव्हा एक वर्षे काम थांबले. नंतर काम सुरू झाले, मात्र तोवर सत्तांतर झाले. तीन चाळी पाडायला इतके दिवस लागत आहेत, तर चार चाळींचे काम कधी होणार असा सवाल केला जात आहे. ना.म.जोशी मार्गावरील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात झाली असली तरी प्रत्यक्षात कामाने वेग घेतलेला नाही. म्हाडाला हा प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण करावयाचा आहे. मात्र, पात्रता निश्चित होण्यासह संक्रमण शिबिर मिळण्यापासून ते चाळी रिकाम्या करण्यापर्यंतच्या प्रक्रियेत सातत्याने अडथळे येत आहेत. तसेच पुनर्विकासातही दिरंगाई होत आहे.

- एकूण चाळी ३२ आहेत.

- १० चाळींचे काम पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात आले.

- १० पैकी एक चाळ पाडण्यात आली. दोन चाळी रिकाम्या करण्यात आल्या आहेत. त्या पाडण्यात आलेल्या नाहीत.

- उर्वरित चार चाळींतील रहिवाशांना संक्रमण शिबिर देण्यात आले आहे. मात्र, त्या रिकाम्या करण्यात आलेल्या नाहीत.

- शिवाय तीन चाळी अशा आहेत ज्यांची अंतिम पात्रता निश्चित झाली आहे. मात्र, त्यांना संक्रमण शिबिर देण्यात आलेले नाही.

- ११ क्रमांकाची चाळ पाडण्यात आली. त्यातील ८० कुटुंबांना लोअर परळ येथे स्थलांतरित करण्यात आले.

- १२ नंबर चाळ येथील ७२ कुटुंबे स्थलांतरित झाली. ८ खोल्या रिकाम्या झालेल्या नाहीत. यांचे म्हणणे असे आहे, खोलीचा करारनामा त्यांच्या नावाने झाला पाहिजे. म्हाडाने अजून ते त्यांच्या नावाने केलेले नाही.

- ३० क्रमांकाची चाळ रिकामी झाली आहे. ७७ खोल्या रिकाम्या झाल्या आहेत. तीन खोल्या रिकाम्या होणे बाकी आहे.

- उर्वरित चार चाळींत १२५ कुटुंबे आहेत. येथील रहिवाशांची पात्रता निश्चित झाली आहे. त्यांना संक्रमण शिबिर देण्यात आले आहे. मात्र, दोन वर्षे झाले काहीच कार्यवाही झालेली नाही.

- १३, १४ आणि १५ चाळींना संक्रमण शिबिर देण्यात आलेले नाही. त्यामुळे या चाळी रिकाम्या झालेल्या नाहीत. तिन्ही चाळी मिळून २४० कुटुंबे आहेत.

चार चाळींमधील रहिवाशांना प्रकाश कॉटन, वेस्टर्न इंडिया येथे संक्रमण शिबिर देण्यात आले आहे. मात्र, मूळ चाळी रिकाम्या करण्यात आलेल्या नाहीत. मात्र, म्हाडाचे अधिकारी लक्ष घालत नाहीत. कामाची, घराची शाश्वती मिळत नसल्याने रहिवासी घरे रिकामी करण्यास तयार नाहीत.

तर बी.डी.डी. चाळीच्या पुनर्विकासाचे काम वेगाने व्हावे, असे आमचे म्हणणे आहे. आतापर्यंत रहिवाशांनी प्रत्येक कामात सहकार्य केले आहे. म्हाडानेदेखील सहकार्य केले आहे. मात्र, सत्तांतराचा फटका बी.डी.डी. चाळींमधील रहिवाशांना बसू नये. कारण गेल्या कित्येक वर्षांनी चाळीमधील पिढ्यांनी नव्या घराची स्वप्ने उराशी बाळगली आहेत, अशा प्रतिक्रिया रहिवाशी व्यक्त करीत आहेत.

काम थांबलेले नाही, सुरु आहे...
रहिवासी करार करण्यासाठी प्रतिसाद देत नाहीत. लॉटरी झाली. पात्रता ठरविली. कोणत्या इमारतीमधील कोणत्या रहिवाशांनी नोंदणीसाठी यायचे याची तारीख आणि वेळदेखील ठरविली. मात्र, रहिवासी फिरकत नाहीत. रहिवाशांकडून सहकार्य अपेक्षित आहे. मात्र विरोधाचे कारण समजत नाही. एक इमारत रिकामी झाली आहे. एक इमारत बाकी आहे; त्यात पोलिसांची आठ कुटुंबे राहत आहेत. घरांची किंमत निश्चित झालेली नाही म्हणून येथे विरोध होत आहे. कागदपत्रे नोंदणी मधला सहभाग नगण्य असता कामा नये. थोडक्यात काम कुठेही थांबलेले नाही. काम सुरु आहे.
- डॉ. योगेश म्हसे, मुख्य अधिकारी, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, म्हाडा

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com