संग्रामनगर उतारावरील रस्ता दुरुस्तीला मुहूर्त मिळेना (Video)

Aurangabad
AurangabadTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : शहानुरवाडीकडून संग्रामनगर उड्डाणपुलावरील चढ -  उतारावरील खड्डेमय रस्त्यात दुचाकी खड्ड्यात कोलमडून अपघात होत आहेत. एमआयडीसी प्रशासन रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी मुहूर्त शोधत आहे का, असा संतप्त सवाल वाहनचालक आणि सातारा - देवळाईसह बीड बायपासकरांनी उपस्थित केला आहे.

गत दोन आठवड्यापुर्वी एमआयडीसीच्या जलवाहिनी दुरूस्तीमुळे पडलेल्या खड्डेमय रस्त्यातून वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांत वाहने आदळल्याने वाहनांचे नुकसान होत आहे, तर कंबर, पाठ आणि मणक्याचा त्रास होत असल्याचे चालक, सहप्रवाशांनी सांगितले. सोबतच शाळकरी मुलांची बस, छोटी वाहने खड्ड्यात आदळताच चाकरमानी, शाळकरी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांची तारांबळ उडत आहे. जलवाहिनी दुरूस्त करून वीस दिवसाचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे एमआयडीसीतील दुर्लक्षित कारभारी कार्यकारी अभियंता रविचंद्र गिरी, उप अभियंता सुधीर सुत्रावे, सहाय्यक अभियंता प्रशांत सरग यांनी तातडीने खड्डा बुजवावा,अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे. 

Aurangabad
नगर-मराठवाड्याने का ठोकलाय नाशिक विरुद्ध शड्डू? नेमका काय आहे वाद?

याआधी जलवाहिनी दुरूस्ती केल्यानंतर कारभाऱ्यांनी मुरूम आणि गिट्टी खड्ड्यात न टाकता चक्क जुनाट बिल्डिंग मटेरियल टाकुन खड्डे बुजवण्याचा काळाबाजार केला होता. टेंडरनामाने एमआयडीसीच्या बड्या अधिकाऱ्यांचा कारनामा उघड केल्यानंतर मनपाचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी एमआयडीसी प्रशासनाला इंडियन रोड काॅंग्रेसच्या (आयआरसी) मानकाप्रमाणे रस्ता जसा होता, त्याच पध्दतीने तातडीने खड्डा बुजवण्याची नोटीस बजावली होती. तसेच पानझडे यांच्या आदेशाने कार्यकारी अभियंता भागवत फड यांनी देखील पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने रस्ता दुरूस्तीच्या सूचना केल्या होत्या. मात्र आठ दिवसात रस्ता चकाचक करणार असे सांगणाऱ्या एमआयडीसीतील अधिकाऱ्यांनी रस्त्याची अद्याप दुरूस्ती केली नाही.

यासंदर्भात गृहिणी नलिनी सरदेशपांडे, आदिती चौगुले म्हणाल्या की, बीड बायपासलगत या मुख्य उड्डाणपुलावरील उतारावरील रस्त्यातच मोठा खड्डा व त्यात टाकलेले बिल्डिंग मटेरियल उघडे पडल्याने ये-जा करताना नको झाले आहे. वाहने खड्ड्यात गेली की, प्रचंड धुळ उडते, खड्डेमय रस्त्यावरून वाहने चालवताना खडी पसरल्याने वाहने घसरून अपघात होत आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी वाहनासह या मार्गाने जावे की नाही, अशी भयावह परिस्थिती झाल्याचे त्यांनी सांगितले.

Aurangabad
समृद्धीवरून प्रवास करणाऱ्यांचे आठवड्यातच वाचले ५० कोटी कारण...

एमआयडीसीच्या कारभाऱ्यांना नाटकाचा अडसर

दरम्यान, एमआयडीसीचे उप कार्यकारी अभियंता सुधीर सुत्रावे म्हणाले की, त्या भागात छत्रपती संभाजी महाराज महानाट्य सुरू असल्यामुळे सर्वत्र वाहनांच्या रांगा लागत आहेत. आधीच मोठ्या कसरतीने वाहतूक वळवन्याची परवानगी घेउन कसे तरी जलवाहिनी दुरूस्तीचे काम २४ तासांत केले. आता नाटकामुळे वाहतूक चार पट झाल्याने दुरूस्तीसाठी वाहतूक शाखेकडून परवानगी मिळणे अशक्य आहे. मात्र आम्ही रस्ता दुरूस्तीसाठी औरंगाबादच्या मस्कट कंस्ट्रक्शन कंपनीची नियुक्ती केली आहे. खड्डेमय रस्ता झाला आहे, आम्ही मान्य करतो. पण  त्याची दुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. चार दिवसांत रस्ता चकाचक करणार अशी ग्वाही त्यांनी टेंडरनामाशी बोलताना दिली. मात्र गेली वीस दिवस कारभाऱ्यांनी झोपा काढल्या होत्या का, असा संतापाचा सूर औरंगाबादकरांमधून निघत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com