
औरंगाबाद (Aurangabad) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'चला जाणूया नदीला' या अभियानात औरंगाबाद जिल्ह्यातील दुधना, खाम आणि शिवना या तीन नद्यांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आस्तीककुमार पाण्डेय यांनी या अभियानाचे आयोजन करण्यासाठी उपजिल्हाधिकारी संगिता सानप यांची नोडल अधिकारी म्हणून निवड केली आहे.
लोकसहभागातून होत असलेल्या या उपक्रमात शिवना नदीसाठी गोकुळ सुरासे, सतीष वाघ, अनिकेत लोहीया, हुसेन गवळी, संजय गवळी,दुधना नदीसाठी रमाकांत कुलकर्णी, सारंग साळवी, रत्नदीप मुंढे तसेच खामनदीसाठी समन्वयक म्हणून शामदंडे अन्ना वैद्य, आनंद असोळकर, चंद्रकांत सोनवणे आदींची समनवयक म्हणून निवड करण्यात आली आहे. यासंदर्भात लवकरच जिल्हास्तरीय समितीची निवड केली जाणार असल्याचे सानप यांनी टेंडरनामा प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्य सरकारच्या सांस्कृतिक संचालनालयाने जलबिरादरीचे अध्यक्ष राजेंद्रसिंग यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील ७५ नद्या अमृतवाहिनी करण्यासंदर्भात एक मोठे पाउल उचललेले आहे. याच अभियानात औरंगाबाद शहराच्या हद्दीतून वाहणाऱ्या खाम व सुखना नदीचा समावेश करण्यात यावा यासंदर्भात टेंडरनामाने वृत्त प्रकाशित केले होते.
त्यावर राज्यातील चला जाणूया नदीला या उपक्रमाचे राज्य समिती सदस्य रमाकांत कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांण्डेय यांना जिल्हास्तरीय समिती गठीत करणे व नोडल अधिकाऱ्य ची नियुक्ती करण्यासंदर्भात नेमणूक करावी अशी मागणी केली होती. या अभियानात औरंगाबाद जिल्ह्यातील खाम, शिवना आणि दुधना या तीन नद्यांचा समावेश असल्याने या नद्यांना अमृतवाहिनी करण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांण्डेय यांनी कुलकर्णी यांची मागणी तातडीने मान्य करत लोकसहभाग आणि सरकारी पातळीवर नद्यांचे पुर्नरूज्जीवन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कामाला गती देण्यासाठी आणि नदींचा अभ्यास परिक्रमा करण्यासाठी पूर्वतयारी म्हणून रोहयोच्या उपजिल्हाधिकारी संगिता सानप यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यावर लवकरच जिल्हास्तरीय समिती स्थापण करण्यासाठी पांण्डेय यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे आता नद्यांवर काम करणार्या समन्वयकांना विविध सरकारी कार्यालयातून नद्यांची माहिती मिळवणे आणि त्यातून नद्यांची अभ्यास परिक्रमाची पूर्वतयारी पूर्ण करण्यासाठी व पुढील नियोजन करण्यासाठी मोठा दिलासा मिळाल्याचे रमाकांत कुलकर्णी यांनी टेंडरनामाशी बोलताना सांगितले.