उड्डाणपूल, निओ मेट्रोचे स्वप्न अन् दुसरीकडे समांतर रस्ता कागदावरच

Aurangabad
AurangabadTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : शहराची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या जालना रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी एकीकडे सहा हजार कोटीच्या अखंडीत उड्डाणपुल आणि निओ मेट्रोचे औरंगाबादकरांना स्वप्न दाखविले जात आहे. दुसरीकडे या रस्त्याला समांतर असलेला ५१ वर्षापूर्वीचा विकास आराखड्यातील लक्ष्मणचावडी ते एमजीएम रस्ता कागदावरच आहे. यावर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी मौन का पाळले हा संशोधनाचा विषय आहे.

Aurangabad
पंतप्रधान कार्यालयामुळे २६ वर्षांपासून रखडलेला रेल्वे मार्ग रुळावर

तत्कालीन पोलिस आयुक्तांची न्यायालयात धाव 

हा रस्ता पूर्ण हवा, अशी औरंगाबादकरांची अनेक वर्षांची मागणी आहे. मात्र शहरातील लोकप्रतिनिधींकडून ही मागणी पूर्ण झाली नाही. अखेर औरंगाबादकरांच्या वतीने तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात या अर्धवट रस्त्याचा प्रश्न उचलून धरला. खंडपीठाने या रस्त्याला बाधित अतिक्रमणे काढून मालमत्ताधारकांचे इतर ठिकाणी पुर्नवसन करा आणि रस्त्याचे बांधकाम करायचे आदेश दिले होते. मात्र अमितेशकुमार यांची बदली झाल्यानंतर प्रश्न तसाच राहीला.

५१ वर्षापासून अंमलबजावणी नाही

वरद गणेश मंदीर-एमजीएम ते पुढे कॅनाॅटला वळसा घालुन सिडको बसस्थानक-जळगाव रस्त्याला जोडणारा हा जालना रोडला समांतर असणारा रस्ता तत्कालीन नगर परिषदेच्या काळात १९७१ च्या विकास आराखड्यात स्पष्ट दाखवण्यात आला आहे. परंतु विकास आराखड्यातील या रस्त्याकडे तत्कालीन नगरपरिषदेसह मनपाने ५१ वर्ष दुर्लक्ष केले. या रस्त्याच्या विस्तारीकरणाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. विशेष म्हणजे असा समांतर रस्ता आहे याची कल्पना देखील औरंगाबादकरांना २०१२ पर्यंत नव्हती. दरम्यान तत्कालीन मनपा आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी रस्ता रुंदीकरण मोहीम हाती घेतली तेव्हा याचा उलगडा झाला. डॉ. भापकरांच्या काळात लक्ष्मणचावडी ते कैलासनगर स्मशानभुमीपर्यंत रस्ता रूंदीकरण मोहीम हाती घेतली होती.

Aurangabad
मुंबई : महत्त्वाच्या 'या' ब्रीजचे काम बीएमसी २ वर्षात करणार पूर्ण

व्यापारवृद्धीकडे स्थानिकांचे दुर्लक्ष

हा रस्ता रुंद झाला, त्यावरून वर्दळ म्हणजेच वाहतूक सुरू झाली तर येथील व्यापार वाढेल याकडे स्थानिक मालमत्ताधारकांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. येथील रस्ता सध्या केवळ धुळीने माखला असल्याने यावरून फारसे वाहनधारक जात नाहीत. जे जातात ते मध्ये थांबत नाहीत. परंतु रस्ता मोकळा तसेच चकचकीत झाला तर वाहनधारक थांबतील अन् व्यापारवृद्धी होईल पण याकडे लक्ष जात नसल्याचे येथील रहिवासी सांगत आहेत. कैलासनगर ते एमजीएम : १८ मीटर याच रस्त्याचे रुंदीकरण तेही काही ठिकाणी शिल्लक आहे. हे रुंदीकरण झाले तर वरद गणेश ते एमजीएम हा रस्ता मोकळा होईल.

असा होईल फायदा

लक्ष्मण चावडी ते एमजीएम हा रस्ता पूर्ण झाला तर औरंगपुरा, शहागंज, पानदरिबा, राजाबाजार तसेच शहराच्या जुन्या भागाकडून सिडको, मुकुंदवाडी, चिकलठाणा, नारेगावकडे जाणारी वाहने जालना रस्त्यावर येणार नाहीत. ती एकतर सेव्हन हिल्स येथे जालना रस्त्यावर येतील किंवा मध्यवर्ती जकात नाक्यामार्गे पुढे सिडकोकडे जातील. त्यामुळे किमान ५० टक्के वाहने जालना रस्त्यावरून कमी होतील, असा अंदाज आहे.

हे आहेत अडथळे 

हा रस्ता वरद गणेश मंदिर ते लक्ष्मण चावडीपर्यंत अतिक्रमणमुक्त आहे. काही ठिकाणी ती हटवावी लागतील, पण त्यात फारसे अडथळे नाहीत. भापकरांनी लक्ष्मणचावडी ते कैलासनगर स्मशानभुमीपर्यंत शेकडो मालमत्ताधारकांना इतरत्र जागा देऊन भूसंपादन केले होते. रस्ता देखील मोकळा झाला होता. मात्र पुढे या मार्गातील ६० विद्युत खांब हटविण्यासाठी महावितरकडे मनपाने निधी नसल्याचे कारण पुढे केल्याने रस्त्याचा तिढा कायम राहीला. परिणामी रस्ता होत नसल्याचे पाहून जिगेचा मोबदला घेणार्यांनी पुन्हा अतिक्रमण केल्याने अडचणीत वाढ झाली. 

● कैलासनगर स्मशानभुमी ते बसैय्येनगर मार्गात ३० बांधकामांचे भूसंपादन मनपाने केले नाही. यासाठी साडेचार ते पाच कोटी रूपये मोजावे लागणार असल्याने मनपाने माघार घेतल्याचे समोर आले आहे. तथापी न्यायालयाच्या आदेशाने मनपाकडे रोख मावेजा नसेल तर  टीडीआर (विकास हस्तांतरण हक्क) देता येते.परंतु मनपाने यासाठी अद्याप पाऊल उचलले नाही.

● बसैय्येनगर ते सेव्हनहील-जकातनाका रस्ता दरम्यान रस्ता मोकळा आहे. पण पुढे एमजीएमने प्रियदर्शनी उद्यानापर्यंत एक ते दिड किलोमीटरचा रस्ता अनधिकृतपणे ताब्यात घेत त्यावर दुतर्फा पार्किंग व रूग्णालयासमोर लोख॔डीगेट बसवले आहे. हा रस्ता मनपाने ताब्यात घेऊन सार्वजनिक वाहतूकीसाठी खुला करणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com