स्टिंग ऑपरेशन : कचरा प्रकल्पातील लिचेड थेट सिडको अन् खाम नदीत

Aurangabad
AurangabadTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : मनपातर्फे चिकलठाणा व पडेगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पावर दररोज सुमारे ३०० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. मात्र कचऱ्यातून निघणारे लिचेड थेट नाल्यातील भुमिगत गटारीत सोडण्यात येत असल्याने औरंगाबादकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे. यासंदर्भात नागरिकांनी टेंडरनामा प्रतिनिधीकडे तक्रार दाखल केली. प्रतिनिधीने सलग दोन दिवस प्रकल्पातील हौदातील लिचेड टँकरद्वारे कोठे नेले जाते याची पाहणी केली. त्यात नागरिकांच्या तक्रारीत शिक्कामोर्तब झाले. प्रतिनिधीने सलग दोन दिवस कॅमेऱ्यात कैद केलेले हे चित्र मात्र आता घनकचरा व्यवस्थापन प्रमुख आणि सहाय्यक आयुक्तांना आवाहन देणारे आहे.

Aurangabad
गडकरी, फडणवीस असूनही मिहान हवेतच;४ महिन्यांपासून ना बैठक, ना आढावा

एनजीटीच्या आदेशानुसार लिचेडची विल्हेवाट लावण्यासाठी कचरा प्रकल्पाजवळचश एलटीपी प्लॅट तयार करणे अपेक्षित आहे. परंतु मनपाने प्रकल्पातील कचरपट्टीच्या पायथ्याशी नाल्या तयार करून लिचेड लाखो लिटरच्या टँकमध्ये साठवले जाते. तेथून पाच हजार लिटरचे तीन टॅकर आणि दहा हजार लिटरच्या तीन टँकरद्वारे हे लिचेड थेट जालनारोडच्या शेजारी सिडको एन-२ लगत श्रीरामनगरच्या कमानीलगत स्वच्छतागृहाच्या बाजुला भूमिगत गटारीच्या चेंबरमध्ये सोडले जाते. तर पडेगाव कचरा डेपोतील लिचेड खामनदीत सोडले जाते. यावर डिझेलपोटी मनपाच्या यांत्रिकी विभागामार्फत दररोज २५ हजार रूपये खर्च केले जात आहेत.

कधी काढणार एलपीटीवर तोडगा? 

चिकलठाणा व पडेगाव कचरा प्रकल्पातून बाहेर निघणार्‍या लिचेडवर महापालिकेने अजूनही तोडगा काढलेला नाही. यापूर्वी कचरा प्रकल्पातील लिचेड थेट शेतात सोडल्याने शेतकऱ्यांनी अनेकदा आंदोलन करत प्रकल्पाला कुलूप ठोकल्याचे प्रकार देखील घडले आहेत. शहरातून येणारे कचर्‍याचे ट्रक गेटवरच रोखून काही ट्रकच्या चाकांची हवा सोडून शेतकर्‍यांनी संताप देखील व्यक्त केला होता.   

ड्रेनेजलाइन टाकलीच नाही

दरम्यान शेतकऱ्यांचा पारा सरकल्याचे पाहून मनपाने लिचेडचा त्रास कमी करण्यासाठी चिकलठाणा कचरा प्रकल्प ते झाल्टा तसेच पडेगाव कचरा प्रकल्प ते कांचनवाडी एसटीपी  प्लॅटपर्यंत स्वतंत्र ड्रेनेजलाइन टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अद्याप ड्रेनेजलाईन टाकली नाही.

Aurangabad
पुणे-औरंगाबाद ग्रीन कॉरिडॉरमुळे रिंगरोडला होणार 'हा' फायदा

एलटीपी प्लॅट नाहीत

चिकलठाणा आणि पडेगाव कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी रोज प्रत्येकी सुमारे १५० टन कचर्‍यावर प्रक्रिया केली जाते. घनकचरा व्यवस्थापन कायद्यानुसार कचरा प्रकल्पाच्या ठिकाणीच स्वतंत्र लिचेडवर शास्रोक्त पद्धतीने ट्रिटमेंट करण्यासाठी एलटीपी (लिचेड ट्रिटमेंट प्लॅट) असणे बंधनकारक आहे. मात्र मनपाने गत चार वर्षात पडेगाव आणि चिकलठाणा कचरा प्रकल्पांवर प्लॅट उभे केले नाहीत. 

शेतकऱ्यांचे आंदोलन

तिजोरीतील खडखडाट आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचा असहकार अशा अडचणीच्या चक्रव्युहात सापडलेल्या मनपाने कचरा प्रकल्प सुरू केल्यापासून पडेगाव आणि चिकलठाणा कचरा प्रकल्पातील कचरपट्टीच्या खाली काॅक्रीट नाल्या तयार करून लिचेड थेट आसपासच्या नदी नाल्यात उघड्यावर सोडुन देण्यात आले होते. मात्र आसपासच्या शेतकर्यांच्या विहिरी, हातपंपातील पाण्याला वास येऊ लागल्याने व शेतातील हिरवीगार पिके, झाडी जळू लागल्याने शेतकर्यांनी अनेक वेळा प्रकल्पांना कुलुप ठोकले. त्यावर मनपाने नदी-नाल्यात वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह बंद करून टॅक बांधले. मात्र पावसाळ्यात टॅक ओव्हरफ्लो होत असल्याने तसेच कचरपट्टीलगत  लिचेडचे हे पाणी पुन्हा नदी, नाले ओढ्यातून वाहून त्याचा पाझर परिसरातील विहिरींमध्ये फुटत असल्याने विहिरींतील पाणी दूषित होत असल्याच्या  शेतकर्‍यांच्या  तक्रारीत पुन्हा वाढ झाली. सद्यस्थितीत लिचेड टँकच्या परिसरातील शेतजमीनीत देखील लिचेडचे पाणी पाझरत आहे. यामुळे शेतकर्यांची आंदोलने सुरूच आहेत.

कंत्राटदार मालामाल, लिचेडचे काय?

विशेष म्हणजे एलटीपी प्लॅट अंतर्गत प्रक्रिया केल्यानंतरच हे पाणी प्रकल्पातून बाहेर पडणे आवश्यक आहे. यासंदर्भात एकाने एनजीटीत दाद मागितल्यावर एनजीटीच्या आदेशाने मनपा प्रशासकासह  मनपातील काही अधिकारी , जिल्हाधिकारी व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील अधिकारी व शहरातील पर्यावरण प्रेमींची एक समिती देखील स्थापण करण्यात आली होती. मात्र मागील चार वर्षापासून लिचेडची डोकेदुखी कायम आहे. कंत्राटदार किशन भाटी हा ओल्या कचर्यापासून शेंद्रीय खत तयार करून आठ ते दहा हजार रूपये  टनाप्रमाणे विक्री करून कोट्यावधी रूपयांची कमाई करत मालामाल होत आहे. मात्र लिचेडचे पाणी मागील काही वर्षांपासून उघड्यावर सोडुन देत आहे. 

Aurangabad
नागपूर पालिकेला CNGचेही वावडे; इलेक्ट्रिक वाहनांचे टेंडर 'फिक्स'

नुसतीच आश्वासनांची खैरात 

त्यामुळे औरंगाबाद, चिकलठाणा, नारेगाव, महालपिंप्री, गोपाळपुर, वरूड काझी, सुलतानपुर, पिसादेवी , सावंगीपर्यंत दिवसरात्र या लिचेडचा उग्रवास डोकेदुखी बनला आहे. यामुळे साथरोगांचा देखील फैलाव होत आहे. आसपासच्या शेतकर्यांच्या शरिरावर गाठी होत आहेत.  त्यामुळे शेतकरी दर आठ दिवसाला आंदोलन करत कचर्‍याच्या गाड्या रोखून धरत आहेत. माजी पालकमंत्री सुभाष देसाई,  माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, तत्कालीन मनपा प्रशासक डाॅ. विनायक निपुण, आस्तिककुमार पांण्डेय यांनी वेळोवेळी पाहणी केली. महाराष्ट्र प्रदूषन नियंत्रण मंडळाच्या नोटीसांचा भडीमार तसेच एनजीटीने एलपीटी प्लॅट उभा करण्याबाबत दिलेली ताकीद ,याची  कल्पना संबंधितांना असून देखील नागरिकांच्या  डोकेदुखीचा त्रास कमी झाला नाही.  

अखेर मनपाने केला असा जुगाड

चिकलठाणा व पडेगाव येथील कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतर कचऱ्यातून बाहेर पडणाऱ्या लिचेडचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी निधी अभावी मनपाने एलपीटी प्लॅट उभारण्यापासून माघार घेतली. तिकडे लिचेड सोडले तर शेतकर्यांची बोंबाबोंब यातून सुटका करण्यासाठी मनपाने  या दोन्ही प्रकल्पातील लिचेडसाठी नव्याने लाखो लीटर क्षमतेचे टॅंक तयार केले. हे पाणी तिथून झाल्टा आणि पडेगाव एसटीपी प्लॅटमध्ये टॅकरद्वारा उचलण्याचा निर्णय मनपाने घेतला. 

पण मनपा कर्मचाऱ्यांनी शोधला शाॅटकट उपाय ...

पण मनपातील टँकरचालक चिकलठाणा येथील प्रकल्पातून लिचेड थेट नवीन औरंगाबादचा मध्यवर्ती भागातील रामनगर स्वच्छतागृहालगत टाकतात. तर पडेगावातील लिचेड कांचनवाडी  प्रकल्पात न नेता खामनदीतील भूमिगत गटारीच्या चेंबरमध्येच सोडले  जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. 

थेट सवाल : सोमनाथ जाधव , घनकचरा व्यवस्थापण विभागप्रमुख तथा सहाय्यक आयुक्त , मनपा

Q  : पडेगाव आणि चिकलठाण्यातील एलटीपीचे ( लिचेड ट्रिटमेंट प्लॅट) काय झाले.

A . पडेगाव येथे १५ व्या वित्त आयोगातून जवळपास एक कोटी २० लाख रूपये खर्च करून एलटीपी प्लॅन्टचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर याच निधीतून काम करणार आहोत. सद्यस्थितीत या दोन्ही प्रकल्पातील लिचेड थेट झाल्टा आणि कांचनवाडी प्रकल्पात टॅकरद्वारे पोहोचवत शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावली जाते.

Q  : पण चिकलठाण्यातील लिचेड औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती भागात सिडको रामनगरातील स्वच्छतागृहानजीक तसेच पडेगावातील लिचेड खामनदीच्या भुमिगत गटारीच्या चेंबरमध्ये सोडले जाते, हे खरे आहे काय ? 

A : नाही , हे कदापी शक्य नाही. अहो,  मी  शंभर टक्के सांगतो असे होऊच शकत नाही. टॅकर थेट प्रकल्पातच जाते. 

Q : पण आमच्याकडे तर दोघी ठिकाणांचे फोटो आणि व्हीडीयो आहेत. आता दोषी अधिकाऱ्यांवर आपण काय कारवाई करणार ? 

A : तसे असेल, तर या धक्कादायक प्रकाराची नक्कीच दखल घेऊ. आपल्याकडील पुरावे जरूर पाठवा.

काय म्हणतात तज्ज्ञ

मुळात सिव्हरेजच्या पाण्यापेक्षा लिचेडच्या पाण्यात अधिक घातक विषाणू असतात. यामुळे कधीही बरे न होणार्या घातक आजारांचा मानवी आणि पशुधनावर गंभीर परिणाम होतो. पाण्यातील जैवविविधतेची साखळी नष्ट होऊ शकते. यासाठी कचरा प्लॅटजवळच एलटीपी प्लॅटची निर्मिती करणे आवश्यक आहे. लिचेड कमी करण्यासाठी हाच रामबाण पर्याय आहे. कुठलीही प्रक्रिया न करता लिचेट टॅंकचे आऊटलेट ड्रेनेजलाईनमध्ये सोडणे घातक आहे.जागच्या जागी एका विशिष्ट जंतुनाशक केमिकलच्या मदतीने प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. 

- पी. सी. मल्होत्रा, तज्ज्ञ

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com