
नागपूर (Nagpur) : नागपूर मेट्रो (Nagpur Metro) रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी 21 ऑगस्ट 2014 रोजी झाली आणि 2015 पासून त्याचे बांधकाम सुरू झाले. 2015 ते 2023 या 8 वर्षांच्या प्रवासात महा मेट्रोने (Maha Metro) यशाचे अनेक कीर्तिमान प्रस्थापित केले आहेत.
या दरम्यान नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, त्याला नागपूरकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे नागपूर मेट्रोने आशियातीलच नव्हे तर जगात विक्रम केले आहेत. यामध्ये वर्धा रोड डबल डेकर व्हायाडक्टने जगातील सर्वांत लांब डबल डेकर म्हणून प्रतिष्ठित गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रवेश केला आहे. राज्यातील इतर शहरांमध्येही नागपूर मेट्रोच्या कामाचे कौतुक होत आहे.
नुकतेच नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणी करण्यात आली आणि नवीन आव्हाने आणि दुसऱ्या टप्प्यातील नागपूर मेट्रोच्या प्रगतीची घोडदौड सुरू झाली आहे. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकालपाच्या दुसऱ्या टप्प्याची लांबी 43.8 किमी आहे आणि त्यात 32 मेट्रो स्टेशन आहेत. त्याचे बांधकाम सुरू असताना नागरिकांच्या सहकार्यामुळे कामाला गती मिळाली आहे. म्हणूनच नागपूर मेट्रोला निश्चितच 'मेरी मेट्रो है'चा दर्जा मिळत आहे.
दैनंदिन प्रवासी संख्या 2.20 लाखांवर गेली
मेट्रोच्या कामठी मार्ग आणि सेंट्रल अव्हेन्यू मार्गांच्या उद्घाटनानंतर प्रवासी सेवेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नागपूर मेट्रो ही शहरातील सार्वजनिक वाहतुकीची पहिली पसंती ठरली असून, एका दिवसात 2 लाख 20 हजार प्रवाशांनी प्रवास करण्याचा विक्रम केला आहे.
आता शहरातून मेट्रो सेवा सुरू झाली आहे. यामध्ये महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी, नोकरी व्यावसायिक व महिला मोठ्या संख्येने प्रवास करत असून दर 15 मिनिटांनी सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत नागरिकांसाठी मेट्रो उपलब्ध आहे.