यवतमाळ (Yavatmal) : यवतमाळ जिल्ह्यात शंभर किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील ग्रामीण मार्ग क्षतीग्रस्त झाले आहेत. तसेच काही राज्य आणि प्रमुख जिल्हा मार्गाची सुद्धा अशीच अवस्था झाली. त्यात आठवडाभर कोसळलेल्या पावसामुळे रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.
राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्गाच्या दुरुस्तीला मंजुरी देण्यात आली आहे. या कामांची टेंडरप्रक्रिया सुरू आहे, तर ग्रामीण मार्गाची दुरुस्ती करण्याची आवश्यकता असून, त्यासाठी नियमानुसार प्रस्ताव सादर केल्याचे सांगण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत 4 राज्य महामार्ग आणि 9 प्रमुख जिल्हा मार्ग येतात. त्यामध्ये दारव्हा ते नेर, यवतमाळ, कुपटा जवळा, सावंगी सातेफळ-नेर हे राज्य मार्ग आणि कामठवाडा-चाणी-चिकणी वडगाव गाढवे, लाडखेड फाटा मालखेड लाडखेड पाथ्रडदेवी उचेगाव महातोली शिवणी, तरोडा दारव्हा तळेगाव फुबगाव- नखेगाव, धामणगाव करजगाव भांडेगाव इस्थळ - तळेगाव- पाळोदी, फुबगाव- नखेगाव तरनोळी लोही, लोही बोदेगाव-पिंपळखुटा तोरनाळा, चिखली तरनोळी सातेफळ, रामगाव कोव्हळा धामणगाव वागद, लाखखिंड नायगाव आरंभी या प्रमुख जिल्हा मार्गांचा समावेश आहे. 25 ते 30 किलोमीटर लांबीचे हे रस्ते असून, यावरील 3 ते 4 किलोमीटर अंतरावर खड्डे पडले आहे. या रस्त्यांचा सर्व्हे करून वार्षिक मेंटेनन्ससाठी प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्याला मंजुरी मिळाली असून, सध्या टेंडरप्रक्रिया सुरू आहे. जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाकडे 540 किलोमीटरचे 177 ग्रामीण मार्ग होते. काही पांदण रस्ते दर्जोन्नत केल्याने त्यात भर पडून जवळपास 600 किलोमीटरचे 200 रस्ते झाले आहे. यातील काही रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. 50 किलोमीटरवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे, तर 50 किलोमीटरपर्यंत मेजर रिपेअरिंगची आवश्यकता आहे.
शहरातील रस्त्यावरही जागोजागी खड्डे :
ग्रामीण भागाला लाजवेल अशी शहरातील काही भागांतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहे. तसेच पावसामुळे चिखलाने माखलेल्या मार्गावरून वाट काढावी लागत आहे. वाहनधारक, सायकलस्वार विद्यार्थी, महिला, पादचारी ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाले आहेत. पालिकेने काही ठिकाणी मुरूम, चुरी टाकून तात्पुरते खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला. परंतु सततच्या पावसामुळे त्यावर जास्त चिखल झाला आहे. त्यामुळे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आहे. शासनाच्या वार्षिक बजेटमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्त्यांसाठी भरीव तरतूद केली जाते. परंतु यावर्षी येथील केवळ दोनच कामासाठी निधी मंजूर झाला आहे. त्यावरून दारव्हा तालुक्याला निधी देताना शासनाने आखडता हात घेतल्याचा आरोप होत आहे.