
नागपूर (Nagpur) : कोंढाळी तालुक्यातील पांजरा (काटे) ते कावडीमेट फाट्यापर्यंत सुरू असलेल्या बांधकामामध्ये रस्ते बांधकामासाठी (Road Work) लागणारी नियमावली धाब्यावर बसवून बांधकाम करण्यात आले. बांधकामात भूपृष्ठ मजबूतीत लागणारे दगड, खडीऐवजी मातीमिश्रीत चुनखडीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे हा रस्ता किती दिवस टिकेल, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पांजरा काटे-ते कावडीमेट फाट्यापर्यंत सुरू असलेल्या बांधकामासाठी विधानपरिषद सदस्यांच्या निधीचा वापर करण्यात आला. आमदारांनी दिलेल्या विकास निधीतून झालेल्या बांधकामाच्या चौकशीकरीता सार्वजनिक बांधकाम जि. प.चे वरिष्ठ बांधकाम अधिकारी व गुणवत्ता, दक्षता विभागातील अधिकाऱ्यांकडून चौकशी केल्यावर या कामात झालेला गैरप्रकार उघडकीस येऊ शकतो, असे तक्रारीत म्हटले आहे.
पांजरा काटे-ते कावडीमेट फाट्यापर्यंत सुरू असलेल्या बांधकामाच्या गैरप्रकाराची चौकशी न केल्यास याबाबत बांधकाम मंत्री व आमदार, खासदारांकडे तक्रार करण्यात येईल, असे गावकऱ्यांनी सांगितले. मार्गाचे काम नियमबाह्य झाले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम उप विभागीय अधिकारी डी. वाय. केदार यांना विचारले असता, त्यांनी आधी उडवाउडवीची उत्तरे दिली. विचारलेली माहिती देण्याऐवजी, आधी लेखी तक्रार करा, मग उत्तर देतो, असे म्हणून भ्रमणध्वनी बंद केला.