नागपूर (Nagpur) : अमरावती मार्गावर नागरिकांच्या सुविधांसाठी बनविण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या (Flyover) उभारणीला आता सहा महिन्यांचा अतिरिक्त कालावधी लागणार आहे. यामुळे, या प्रकल्पाचा खर्च 7 कोटींनी खर्च वाढणार असून, तो 478 कोटींहून 485 कोटीवर जाणार आहे.
आरटीओ कार्यालय ते वाडीपर्यंतच्या सुमार 5 किलोमीटरच्या भागात मार्च 2022 पासून या पुलाचे काम सुरू करण्यात आले. 4.79 किलोमीटरच्या या दोन उड्डाणपूल प्रकल्पाच्या बांधकामाला आरटीओ कार्यालय ते रवीनगर चौकापर्यंतची झाडे तोडण्याची परवानगी उशिरा मिळाल्याने बांधकामाला उशीर झाला. याशिवाय वाडी नाका ते पोलिस ठाण्यापर्यंत बनणाऱ्या उड्डाणपुलात 132 केव्हीची लाइनची उंची वाढल्याने काम उशिरा होत आहे.
आता कंत्राटदार कंपनीतर्फे कामाला सहा महिन्यांचा विस्तार देण्याच्या मागणीसह प्रस्ताव दिला आहे. दिवाळीमुळे सुट्ट्यांवर गेलेले कामगार अजूनही परतलेले नाहीत. सध्या आरटीओ ते विद्यापीठ परिसराच्या भागातील काम थंडबस्त्यात आहे.
लोकांना होत आहे त्रास
या उड्डाणपुलाच्या बांधकामात होणाऱ्या दिरंगईमुळे लोकांना त्रास होत आहे. रास्त्यावर अनेकदा ट्रॅफिक जाम होतो, त्यामुळे लोकांना तासंतास ट्रॅफिक जाम मध्ये अडकवून राहावे लागते. तर अनेकदा कामामुळे अनेक दुर्घटना झाल्या आहेत. म्हणून लवकरात लवकर बांधकाम पूर्ण करण्याची मागणी नागरिक करीत आहे.