
अमरावती (Amravati) : वरूड येथे अनेक वर्षांपासून स्त्री रुग्णालयाची मागणी होती. अखेर ही मागणी मान्य झाली असून, लवकरच तालुक्यात 100 खाटांचे स्त्री रुग्णालय सुरू होईल. सार्वजनिक आरोग्य विभागाने या संदर्भातील सरकारी निर्णय जारी केला आहे. या स्त्री रुग्णालयामुळे नागपूर रेफरचे प्रमाण थांबणार असून वरूडलाच लागून असलेल्या मध्य प्रदेशातील काही गावातील गर्भवती महिलांना याचा लाभ होईल.
जिल्ह्यात सध्या अचलपूर आणि अमरावती या दोनच ठिकाणी स्त्री रुग्णालय आहे. त्यामुळे शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालय येथे रोज शेकडो महिला या प्रसूतीसाठी भरती होत असतात. तसेच वरूड ते अमरावतीचे अंतरही 85 किलोमीटर इतके आहे. त्यामुळे वरूड येथून महिलांना याठिकाणी पोहचणे शक्य नसल्याने अनेक गर्भवती महिला नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात भरती होतात. वरूडमध्ये स्त्री रुग्णालय व्हावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिकांकडून होत होती. त्यामुळे विशेष तरतुदी अंतर्गत रुग्णालयाची मागणी शासनाने मंजूर केली आहे. येत्या काही दिवसांत रुग्णालयासाठी जागा संपादित केली जाईल.
प्राथमिक आरोग्य केंद्रे बांधली जातील
मोर्शी तालुक्यातील पिंपळखुटा व रिद्धपूर या गावात नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे बांधण्याची मागणी जिल्हा आरोग्य विभागाने केली होती. ही मागणी सरकारने मान्य केली आहे. पीएचसी उभारण्यासाठी लवकरच जागा शोधली जाईल. जमीन संपादित झाल्यानंतर काम सुरू केले जाईल. जिल्ह्यात आतापर्यंत 62 केंद्रे आहेत. तर मेळघाटात 4 प्रस्तावित आहेत. 6 पीएचसी निर्मितीनंतर प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या 68 होईल.