गडचिरोली (Gadchiroli) : आष्टी-चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावर मागील अनेक दिवसांपासून खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. या पुलावरील खड्डे बुजविण्याची मागणी नागरिकांसह आमदार डॉ. देवराव होळी यांनीही केली होती. संबंधित विभागाने थातूरमातूर डागडुजी केल्याने अल्पावधीत पुलावरील खड्डे 'जैसे थे' झाले आहेत. त्यामुळे जीव गेल्यावरच खड्डे बुजविणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
थातूरमातूर डागडुजी केल्याने आष्टी-चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदी पुलावर मागील अनेक दिवसांपासून जीवघेणे खड्डे पडले असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथील शाळेत आष्टी परिसरातील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी जातात. या विद्यार्थ्यांना पुलावरील खड्डयांमुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तसेच गोंडपिपरी तालुक्यातील नागरिकही विविध कामांसाठी आष्टी येथे येत असतात. त्यांनासुद्धा त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे एखादे वाहन नदीपात्रात कोसळण्याचा धोका असतो. खड्ड्यांमुळे पुलावर अपघात होऊन जीव गेल्यास याला जबाबदार कोण? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
अल्पावधीतच पुन्हा खड्डे, अपघातास आमंत्रण सदर खड्डे त्वरित बुजविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली होती. याची दखल घेत आमदार डॉ. देवराव होळी यांनी पुलाची पाहणी करून राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना खड्डे बुजविण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर हे खड्डे बुजविण्यात आले; परंतु अल्पावधीतच पुलावरील खड्ड्यांची स्थिती 'जैसे थे' झाली आहे.