
बुलढाणा (Buldhana) : बुलढाणा जिल्ह्यातील दोन तालुके अवर्षणग्रस्त घोषित झालेले असतानाच रोहयोच्या कामावरही मजुरांची संख्या वाढत असून, नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर जिल्ह्यातील 145 ग्रामपंचायतींमध्ये 408 कामे सुरू आहेत. दरम्यान, गेल्या तीन महिन्यांपासून रोहयोवरील मजुरांची मजुरी देण्यातही अडचण येत असून, केंद्राकडून येणारे सहा कोटी रुपये अद्याप मिळालेले नाहीत.
जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या 22 टक्के पाऊस कमी पडला आहे. त्यातच रिमोट सेन्सिंग डेटाच्या आधारावर जिल्ह्यातील लोणार आणि बुलढाणा तालुके अवर्षणग्रस्त घोषित करण्यात आले आहे. अन्य तालुक्यातही परिस्थिती बिकट असून हे तालुकेही अवर्षणग्रस्त घोषित करावेत, अशी मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामाची माहिती घेतली असता तब्बल 16 टक्के ग्रामपंचायतींमध्ये मजुरांना कामे देण्यात आली असून, 1942 अकुशल मजूर सध्या त्यावर काम करत आहेत.
मजूर वाढण्याची शक्यता :
राज्याच्या 1980 मधील अवर्षणग्रस्त तालुक्यांच्या यादीत समाविष्ट असलेल्या मोताळा तालुक्यात 598, सिदखेडराजा 571, चिखली 223, बुलढाणा 152, मेहकर येथे 149 मजूर कार्यरत आहेत. अन्य तालुक्यांत तुलनेने कमी मजूर असले तरी तेथेही येत्या काळात हे मजूर वाढण्याची शक्यता आहे.
रोहयोच्या कामावर 36 कोटींचा खर्च :
रोजगार हमी योजनेंतर्गत चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 36 कोटी रुपये खर्च झाला आहे. त्यातही केंद्राचा निधी अद्याप प्राप्त झालेला नाही.
मोताळ्यातील 31 ग्रामपंचायतींमध्ये कामे :
मोताळा तालुक्यातील 31 ग्रामपंचायतींमध्ये ही कामे सुरु आहेत. सिदखेड राजात 27, चिखलीमध्ये 14, बुलढाण्यातील 29 ग्रामपंचायतींमध्ये कामे सुरू आहेत.
केंद्राकडे थकला सहा कोटींचा निधी :
रोहयोच्या कामाचा बुलढाणा जिल्ह्याचा सहा कोटी रुपयांचा निधी केंद्राकडे थकला आहे. राज्याचा विचार करता केंद्राकडे तब्बल 240 कोटी रुपये थकले आहेत. त्यामुळे सध्या कामे प्रभावित होत आहेत. फळबाग, वृक्षलागवड, घरकुल आणि गोठ्याची कामे सुरू आहेत. तालुकानिहाय पाच लाभार्थ्यांची गोठ्यासाठी निवड करण्यात येत आहे.