गोंदिया (Gondia) : गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मालगुजारी तलावांच्या खोलीकरण व दुरुस्तीसाठी पाटबंधारे विभागाने खा. प्रफुल्ल पटेल यांच्या पाठपुराव्यानंतर 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसांनंतर तलाव खोलीकरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
जिल्ह्यातील सडक अर्जुनी व मोरगाव अर्जुनी तालुक्यांतील माजी मालगुजारी तलावांची दुरुस्ती व खोलीकरण करण्याची मागणी दोन्ही तालुक्यांतील नागरिकांची होती. त्या मागणीला अनुसरून पाटबंधारे विभागाने प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावांना मंजुरी मिळावी म्हणून माजी आ. राजेंद्र जैन व जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांनी हा विषय पटेल यांच्या निदर्शनास आणून दिला. पटेल यांनी हा विषय राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे ठेवला.
पवार यांनी नागपूर पाटबंधारे मंडळाचे कार्यकारी संचालक यांच्याकडे पाठवून मंजुरी प्रदान करावी, असे निर्देश दिले. शेवटी सुमारे 5 कोटी रुपये खर्चाच्या खोडशिवानी, मालीजुंगा, गिरोला, खाडीपार, कोसमतोंडी व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मोरगाव या तलावांचे दुरुस्ती व खोलीकरणाच्या कामाला विदर्भ पाटबंधारे विकास मंडळाने मंजुरी दिली आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवनी, कोसमतोंडी, गिरोला, मालेजुंगा, खाडीपार, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मोरगाव या माजी मालगुजारी तलावांची दुरुस्ती करण्याची शेतकऱ्यांची मागणी होती.
असा मिळणार निधी
मोरगाव 95 लक्ष रुपये, खाडीपार 59 लक्ष रुपये, खोडशिवानी 101 लक्ष रुपये, मालीजुंगा 78 लक्ष रुपये, गिरोला 72 लक्ष रुपये व कोसमतोंडी 110 लक्ष रुपये या प्रमाणे निधी मंजूर करून तातडीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे.