भंडारा (Bhandara) : अत्यंत दुर्लक्षित चार रस्त्यांच्या सुधारणांसाठी अर्थसंकल्पी निधीतून (50-54) 33 करोड रुपयांच्या निधीला नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. आठवडाभरात टेंडर (Tender) प्रक्रियांना प्रारंभ होणार आहे. यामुळे लवकरच गुळगुळीत रस्त्यांच्या नवनिर्माणाला सुरुवात होणार असून, वाहनचालकांचा खडतर प्रवास संपणार आहे.
मोहाडी तालुक्यातील करडी ते मुंढरी खुर्द रस्ता परिसरातील अत्यंत वर्दळीचा आहे. परंतु, गत दोन वर्षांपासून उपेक्षित आहे. परिणामी, चिखलयुक्त रस्त्यांवर प्रवास करावा लागत आहे. सातत्याने मागणी होत असताना नुकतेच 4 करोडच्या निधीतून 2 किमी लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण होणार आहे. विशेष म्हणजे सध्याच्या रस्त्याची दीड ते दोन फूट उंची वाढविण्यात येणार आहे.
वैनगंगा नदी घाटाला समांतर निलज खुर्द ते देव्हाडा 3 किमी लांबीच्या रस्त्यासाठी 7 कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. पाणंद रस्त्यावर मातीचा एक फूट भराव टाकून खडीकरण व डांबरीकरण केले जाणार आहे. या रस्त्यामुळे शेतीला व ग्रामीण रहदारीला चालना मिळेल. मांडवी ते खडकी रस्त्यासाठी सुमारे 10 कोटींच्या निधीला मान्यता मिळाली आहे. रस्त्यांच्या विकास कामांसाठी मोठा निधी खेचून आणणार असल्याचे आमदार राजू कारेमोरे यांनी सांगितले.
या प्राप्त निधीतून 4 किमी लांबीच्या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण होणार आहे. हा रस्ता करडी व परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असून भंडारा शहराला जोडणारा जिल्हा मार्ग आहे. मात्र, 3-4 वर्षांपासून दुर्लक्षित आहे. दीड ते दोन फूट खोल खड्ड्यामुळे रस्ता वाहतूकदारांसाठी यमदूत ठरतो आहे. रस्त्यासाठी ढिरवाडाचे सरपंच धामदेव वनवे यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी आमदार राजू कारेमोरे यांनी तातडीने बांधकाम विभागाला पत्र देत प्रस्तावाचे निर्देश दिले होते. वरठी शहरातून जाणाऱ्या जुन्या महामार्गाचे सिमेंटीकरण करण्यासाठी 12 कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे.
रस्त्याचे बांधकाम झाल्यास या मार्गावरील ग्रामवासीयांना मोठा फायदा होणार आहे. विशेषतः विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल आणि वाहतूक व्यवस्थाही नियमित सुरळीत होईल.
मुंढरी ते रोहा पुलानंतर आता चार रस्त्यांचे दर्जोन्नती होणार आहे. शिक्षण, आरोग्य व आवागमनाच्या सोयी वाढतील, अशी माहिती मोहाडीचे उपविभागीय अभियंता भाऊदास पिपरेवार यांनी दिली. रस्त्यांसाठी लोकप्रतिनीधींचे प्रयत्न लाख मोलाचे ठरले. यामुळे करडी परिसराच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य महादेव पाचघरे यांनी म्हटले.