नाशिक (Nashik) : सिडकोतील पेलिकन पार्क म्हणजेच सेन्ट्रल पार्कचे (Central Park) दुसऱ्या टप्प्यातील १८ कोटींचे काम देण्यासाठी राबवलेल्या टेंडर (Tender) प्रक्रियेत १३ टक्के कमी दराने काम करण्यास असलेल्या ठेकेदारास (Contractor) डावलून १४ टक्के अधिक दराने टेंडर मंजूर करण्यात आल्याचा आरोप झाला आहे.
विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून टेंडर दिल्याच्या आरोपाची महापालिकेने गंभीर दखल घेतली आहे. अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी टेंडरमधील सर्व कागदपत्रांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेच्या मालकीच्या सिडकोतील पेलीकन पार्कच्या १७ एकर जागेत शासनाच्या निधीतून दोन टप्प्यांत ३२ कोटी खर्चून सेंट्रल पार्क उभारले जात आहे. यात पहिल्या टप्प्यात १४ कोटी रुपयांची कामे केली असून सध्या दुसऱ्या टप्प्यातील १८ कोटींच्या कामांची टेंडर प्रक्रिया राबवली आहे.
दुसऱ्या टप्प्यातील टेंडर वादात सापडले असतानाच आधीची कामेही वादात सापडली आहेत. ठेकेदाराने केलेली कामे निकृष्ट असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या टप्प्यातील १८ कोटींच्या कामाबाबत ठेकेदाराची उलाढाल पुरेशी नसताना त्यास १८ कोटींचे काम देण्यात आले. या ठेकेदाराने जॉईंट व्हेंचर म्हणून सादर केलेल्या ठेकेदार कंपन्यांसंदर्भातही आक्षेप आहेत. यामुळे विशिष्ट ठेकेदाराला काम देण्यासाठी बांधकाम विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्याने संशय व्यक्त होत आहे.
या आरोपांना आता राजकीय स्वरूप आले आहे. काही माजी नगरसेवक एकत्र आले असून त्यांनी भाजपाच्या एका आमदाराचा व एका नगरसेवकाचा या प्रकरणांमध्ये रस असल्याचा आरोप केला आहे. यामुळे सिडकोतील राजकीय वातावरण तापले आहे. याची गंभीर दखल घेत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त या संपूर्ण प्रक्रियेची फेर तपासणी करणार आहेत.