पुणे (Pune) : रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे टीकेचा भडिमार झाल्यानंतर जाग आलेल्या महापालिकेने खड्डे दुरुस्तीची मोहीम राबविली. रात्रंदिवस जागून खड्डेही बुजविले. खड्डे बुजविण्याची, खचलेल्या चेंबरभोवती डांबर टाकण्याची व पॅचवर्कची कामे मात्र निकृष्ट दर्जाची असल्याचे उघड झाले आहे. अनेक ठिकाणी खड्डे बुजविण्याची कामे अर्धवटच झाली आहेत. अनेक ठिकाणी दुरुस्त केलेल्या खड्ड्यांमधील खडी रस्त्यावर पसरली आहे.
पॅचवर्कच्या कड्याभोवतीचीही खडी निघू लागली आहे. खचलेल्या चेंबरची दुरुस्ती तर केवळ दिखाऊपणाच असल्याचे दिसत आहे. पुन्हा एकदा जोरदार पाऊस झाल्यास दुरुस्त केलेले रस्ते पुन्हा खड्ड्यांत जाण्याची भीती आहे.
पावसामुळे शहराच्या बहुतांश भागांतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. त्याचा परिणाम वाहतुकीवर होऊन ठिकठिकाणी कोंडीची समस्या निर्माण झाली होती. त्यानंतरही खड्डे दुरुस्तीकडे महापालिका प्रशासनाने गांभीर्याने पाहिले नाही.
केंद्रीय विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका व पोलिस प्रशासनाची बैठक घेऊन ४८ तासांत खड्डे बुजविण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर महापालिकेच्या पथ विभागाने शनिवारी व रविवारी रात्रभर काम करून ८०४ खड्डे दुरुस्त केल्याचा दावा केला होता. शहराच्या विविध भागांतील प्रमुख रस्त्यांची पाहणी केली असत त्यामध्ये महापालिकेने खड्डे बुजविण्याचे काम केले, मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे पाहणीत उघड झाले.
ठळक निरीक्षणे
- खडी, काँक्रिट, कोल्ड मिक्सचा वापर करून खड्डे बुजविले आहेत
- बुजविलेल्या बहुतांश खड्ड्यांमधील खडी रस्त्यावर आली आहे
- पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे तयार झाले आहेत
- ठिकठिकाणी केलेल्या पॅचवर्कच्या कामातील खडीही बाहेर पडू लागली आहे
- खचलेल्या चेंबरभोवती अर्धवट डांबर टाकून ते बुजविण्याचा प्रयत्न
- काही ठिकाणी बुजविलेल्या खड्ड्यांच्या ठिकाणी पुन्हा रस्त्याची चाळण
‘शास्त्रीय पद्धती’ नावापुरतीच
रस्त्यावर खड्डा पडलेली जागा चौकोनी आकारात कटरच्या साहाय्याने खोदली जाते. त्यातील पाणी काढून खड्डा स्वच्छ केला जातो. त्यानंतर त्यावर डांबराची फवारणी केली जाते. पुढे उपलब्ध हॉट मिक्स किंवा कोल्ड मिक्स मटेरिअलचा वापर करून खड्डा बुजवला जातो. त्यावर रोलिंग केली जाते. त्यानंतर त्यावर पुन्हा डांबर लिक्विडची पट्टी मारली जाते. अशा शास्त्रीय पद्धतीने खड्ड्यांची दुरुस्ती केली जाते. प्रत्यक्षात शास्त्रीय पद्धतीने खड्डे बुजविण्याचे काम केवळ नावापुरतेच झाल्याची सद्यःस्थिती आहे.