Pune : पुण्याला आता स्कायबस शिवाय पर्याय नाही..! असे का म्हणाले गडकरी?
पुणे (Pune) : पुण्यातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी नवे तंत्रज्ञान आणण्यावर भर दिला जाईल. त्याचबरोबर पुण्यातील रस्त्यांच्या विस्ताराला मर्यादा आहेत. त्यामुळे पुण्यात काही ठिकाणी हवेतून उडणाऱ्या बस (Sky Bus) आणणे आवश्यक आहे, अशी घोषणा केंद्रीय रस्ते विकास आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केली. चांदणी चौकातील (Chandani Chowk) उड्डाणपूल आणि एकात्मिक रस्ते पायाभूत सुविधांच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात गडकरी यांनी ही घोषणा केली.
वाहन उद्योगात भारत तिसऱ्या स्थानी आला असून, लवकरच तो पहिल्या क्रमांकावर पोहचणार आहे. वाहन उद्योगात आघाडीवर असलेले पुणे शहर पुढील पाच वर्षांत देशाच्या केंद्रस्थानी येणार आहे. त्यामुळे पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्याती आवश्यकता आहे, असे गडकरी म्हणाले.
पुण्याला येऊन मिळणाऱ्या पाचही रस्त्यांवर मोठे प्रकल्प सुरू आहेत. एकूण ६० हजार कोटींची कामे केली जाणार आहेत. या कामांसाठी राज्य सरकारकडूनही सहकार्य अपेक्षित आहे, अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली.
या वेळी गडकरी यांनी आपल्या भाषणात देशातील महामार्गांचा विस्तार, महत्त्वाच्या शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना आदींची ही माहिती दिली. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह अनेक खासदार, आमदार आदी उपस्थित होते.