
पुणे (Pune) : पुणे शहरातील ९२ किलोमीटर लांबीचे प्रमुख १५ रस्ते खड्डे आणि अतिक्रमणमुक्त करण्यासह पाणी पुरवठा, सांडपाणी वाहिनी, पावसाळी गटार, विद्युत व्यवस्थेची कामे पूर्ण करण्यासाठी घोषणा पुणे महापालिकेने यापूर्वी केली होती. आता यासाठी १० ऑक्टोबरपासून या रस्त्यांवर प्रत्यक्षात काम सुरु होणार आहे. हे रस्ते चकाचक करा अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशा इशारा आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला आहे.
पुणे महापालिकेला ‘जी-२०’ परिषदेच्या तयारीसाठी राज्य सरकारने २०० कोटी रुपये दिले होते. त्यातील १३९ कोटी रुपये हे रस्त्यांच्या कामासाठी खर्च केले जाणार होते. यासाठी शहरातील महत्त्वाचे प्रमुख १५ रस्ते निवडून तेथील खड्डे नऊ ऑगस्टपूर्वी बुजविण्याचे आदेश दिले होते. पण ही कामे न झाल्याने पावसाळ्यानंतर व्यवस्थितपणे व इतर विभागांच्या सहकार्याने ही कामे केली जातील असे प्रशासनाने स्पष्ट केले. यामध्ये खड्डे बुजविण्यासह पादचारी मार्गांची दुरुस्ती, अतिक्रमण काढणे, अनधिकृत बांधकाम पाडणे, पावसाळी गटार, पथदिवे दुरुस्ती, जलवाहिनी दुरुस्ती व नव्याने टाकणे ही काम पूर्ण करून रस्ता डांबरीकरण केले जाणार आहे.
गणेशोत्सवानंतर आयुक्त विक्रम कुमार यांनी शहरातील रस्त्यांच्या स्थितीचा आढावा घेतला. ‘मिशन १५’ मधील रस्त्यांची दुरुस्ती व इतर कामे १० ऑक्टोबपासून सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. जर या रस्त्यांवर १० ऑक्टोबरनंतर अतिक्रमण, अनधिकृत पथारी दिसल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
‘मिशन १५’तील रस्ता आणि लांबी (किलोमीटरमध्ये)
नगर रस्ता - १४
सोलापूर रस्ता - ६
मगरपट्टा रस्ता - ७
पाषाण रस्ता - ३.५
बाणेर रस्ता - ७.५
संगमवाडी रस्ता - ४.३
विमानतळ व्हीआयपी रस्ता - ४.५
कर्वे रस्ता -६.५
पौड रस्ता - ४.३
सातारा रस्ता - ७
सिंहगड रस्ता - ९
बिबवेवाडी रस्ता - ४.५
नार्थमेन रस्ता -३.६
गणेशखिंड रस्ता - ३.३
बाजीराव रस्ता - ७
गणेशोत्सवानंतर रस्त्यावरील मांडव, जाहिरात कमानी तत्काळ काढून घ्याव्यात. मंडप व पावसामुळे पडलेले खड्डे सात ॲाक्टोबरपर्यंत भरावेत. ‘मिशन १५’ अंतर्गत महत्त्वाच्या १५ रस्त्यांचे काम १० ॲाक्टोबरपासून सुरू करून, अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम काढणे, पाणी, सांडपाणी, विद्युत विभागाने कामे त्वरित संपवावीत. १० ऑक्टोबरनंतर रस्त्यांवर, पादचारी मार्गावर कोणतेही अतिक्रमण दिसल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा आदेश आयुक्तांनी दिला आहे.
- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका