
पुणे (Pune) : पुणे महापालिकेने (PMC) मुदतीत मिळकतकर भरणाऱ्यांसाठी घेतलेल्या बक्षीस योजनेतील विजेत्यांना चार चाकी देण्याची प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यासाठीची टेंडर (Tender) प्रक्रिया पूर्ण केली आहेत.
महापालिकेकडून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बक्षीस योजनेची सोडत काढण्यात आली. त्यामध्ये पाच नागरिकांना चारचाकी बक्षीस जाहीर झाले. परंतु, महापालिकेने चारचाकी खरेदीची टेंडर प्रक्रिया वेळेत राबविली नव्हती. त्यावर टीका झाल्यानंतर ही प्रक्रिया त्वरित राबविण्यात आली.
कमी दराने टेंडर पुरविणाऱ्या वितरकांकडून दहा लाख रुपयांपर्यंतच्या पाच वाहनांची खरेदी केली जाणार आहे. वाहनाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महापालिका कार्यक्रम घेऊन त्याचे वितरण करणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, रुग्णवाहिका देण्याची मागणी माजी नगरसेविका ज्योती कळमकर आणि त्यांचे पती गणेश कळमकर यांनी महापालिकेकडे केली होती. करसंकलन विभागाने यासंदर्भात चाचपणी केली, मात्र प्रादेशिक परिवहन विभागाच्या नियम व अटीनुसार निश्चित केलेल्या किमतीमध्ये रुग्णवाहिका घेता येणार नाही. त्यामुळे कळमकर यांची मागणी पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.