
पुणे (Pune) : लहान मुलांच्या उत्सुकतेला, कल्पनाशक्तीला बळ देणारी आणि जगभरातील विमान क्षेत्राशी संबंधित इत्थंभूत माहिती देणारी महापालिकेची ‘एव्हिएशन गॅलरी’ (Aviation Gallery) लवकरच भरारी घेण्याच्या तयारीत आहे.
गॅलरी दीड वर्षांपासून बंद असल्याच्या वृत्ताची महापालिकेने गांभीर्याने दखल घेतली असून, ती पुन्हा सुरू करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. त्यामुळे दिवाळीच्या सुट्यांत गॅलरी मुलांसाठी खुली होण्याची चिन्हे आहेत.
शिवाजीनगर गावठाण परिसरातील महापालिकेच्या शाळेमध्ये तत्कालीन नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे यांच्या प्रयत्नातून ‘सरसंघचालक बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरी’ बांधण्यात आली आहे. तिचे मार्च २०२० मध्ये उद्घाटन झाले.
कोरोनामुळे गॅलरी बंद होती, त्यामुळे महापालिकेने देखभाल-दुरुस्तीकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्यानंतर विमान क्षेत्रातील किंवा त्यासंबंधीची संस्था पुढे येत नसल्याने कोट्यवधी रुपये खर्च करूनही गॅलरी बंद पडली.
महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाने गॅलरी सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनीही त्यासाठी पुन्हा आदेश दिला. आता हा विषय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे. पुढील आठवड्यात ही प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. टेंडर प्रक्रिया झाल्यानंतर मूल्यांकन केले जाणार आहे. त्यानंतर पात्र संस्थेला गॅलरी चालविण्यासाठी दिली जाणार आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘गॅलरी’विषयी...
- शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना विमानांबद्दलची शास्त्रशुद्ध माहिती मिळावी
- प्रदर्शन, प्रत्यक्ष विमान, हेलिकॉप्टरचे मॉडेल, ड्रोन, एरोमॉडलिंग, पॅरामोटरिंग व अंतराळ विज्ञान पाहता यावे
- त्यातूनच मुलांना विमान, अंतराळ विज्ञान क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळावी
एव्हिएशन गॅलरी सुरू करण्यासाठी महापालिका आयुक्त सकारात्मक आहेत. आम्हीही गॅलरीसंबंधीची सर्व माहिती एकत्रित करून, ती सुरू करण्यासाठीची प्रक्रिया एका आठवड्यात पूर्ण करीत आहोत. त्यानंतर अल्पावधीत गॅलरी सुरू होऊ शकते.
- चेतना केरूरे, उपायुक्त, सांस्कृतिक विभाग, महापालिका