
पुणे (Pune) : पुण्याहून वंदे भारत एक्स्प्रेसचा (Vande Bharat Express) प्रवास लांबणीवर पडला आहे. १९ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते मुंबई-पुणे-सोलापूर अशा धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन होणार होते. मात्र गुरुवारी अचानक हा कार्यक्रमच रद्द करण्यात आला.
ही रेल्वे सुरू झाली असती तर पुणेकरांचा मुंबई व सोलापूरचा प्रवास वेगाने झाला असता. शिवाय प्रवाशांना वेगळ्या रेल्वे प्रवासाची अनुभूतीदेखील आली असती. मात्र अचानक हा कार्यक्रम रद्द झाल्याने प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. पंतप्रधान मोदी हे १९ जानेवारीला मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन होणार आहे. या वेळी मुंबई-पुणे-सोलापूर अशा धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचेदेखील मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे नियोजन सुरू होते. गुरुवारी दिवसभर मध्य रेल्वेच्या मुख्यालयापासून ते पुणे व सोलापूर विभागातदेखील विविध स्तरांवर नियोजन सुरू झाले होते. मात्र सायंकाळी सहाच्या सुमारास कोणतेही कारण न सांगता हा कार्य्रक्रम रद्द झाल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.
सोलापूर रेल्वे विभागाने दिलेल्या प्रस्तावात ही रेल्वे सोलापूरहून सकाळी सहा वाजता सुटेल. पुण्याला ९, तर मुंबईला सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी पोहचेल. तसेच सायंकाळी पाच वाजता मुंबईहून निघेल, पुण्याला रात्री ८ वाजता आणि सोलापूरला रात्री साडेअकरा वाजता पोचणार आहे. मात्र मुंबई विभागाने या वेळेत हस्तक्षेप करीत बदल केला.
मुंबई विभागाने वंदे भारत मुंबईहून सुरू करण्याचा आग्रह धरला. त्यानुसार मुंबईहून सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी निघेल. सोलापूरला दुपारी १ वाजता पोचेल, तर सोलापूरहून सायंकाळी ५ वाजता सुटेल आणि मुंबईला रात्री ११. ३० मिनिटांनी पोचेल. मात्र सकाळच्या सत्रात कामानिमित्त जाणाऱ्यांच्या दृष्टीने ही रेल्वे सोलापूरहून सुटणे गरजेचे आहे. तरच याला प्रवाशाचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यांवरून पुणे विभागानेदेखील सोलापूरहून रेल्वे सुरू करण्याचा आग्रह धरला आहे.